भयंकर प्रकोपाने ग्रामीण भाग हादरला

नागपूर :  ग्रामीण भागात गावोगावी करोनाने हैदोस घालणे सुरू के ले असून मृत्यूसंख्येतही झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे भयभीत झालेले गावकरी करोनापासून वाचण्यासाठी शेतावर जाऊन राहू लागल्याचे चित्र अनेक गावात आहे. करोनराच्या भयंकर प्रकोपाने प्रत्येक जण हादरला आहे. लागण झाल्यास उपचार सोयी नाहीत, इस्पितळात जागा नाही, त्यामुळे करोनाची बाधाच होऊ न देणे हा त्यावरील सर्वोत्तम पर्याय माणून अनेकांनी गाव  सोडून जवळच्या छोट्या गावात नातेवाईकाकडे मुक्काम ठोकणे सुरू केले आहे.

रामटेक तालुक्यातील पारशिवनीजवळ असलेले दोन हजार लोकवस्तीचे साटक हे गाव असून या गावात २०० पेक्षा अधिक लोक करोनाबाधित असून २२ लोक करोनामुळे दगावले आहे. त्यामुळे  गावात भीतीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे गावातील २५ पेक्षा अधिक कुटुंब शेतावर जाऊन राहू लागले, असे  गावातील ज्येष्ठ नागरिक रामकृष्णम सेन्नमा यांनी सांगितले.

याच गावातील  उपसरपंच राम मुरमुरे म्हणाले, गावात प्राथमिक आरोग्य सेवा पुरेशा नाही. शहरातील अनेक लोक गावात येऊ लागल्याने करोनाचा संसर्ग होऊन बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे  अनेक लोक गाव सोडून शेतात राहण्यासाठी गेले आहे. कळमेश्वरजवळील वऱ्हाडा या अडीच हजार लोकवस्तीच्या गावात १५० पेक्षा अधिक करोना बाधीत रुग्ण असून १७ लोक आतापर्यंत करोनाने दगावले आहे. याशिवाय नरखेड तालुक्यातील आमडा या गावात ६० ते ७० करोनाबाधित लोक असून गावातील अनेक शहरात आणि लोक गावाजवळून २ ते ३ किमी  लांब  शेतात जाऊन राहू लागले आहे.

अनेक लोक स्वयंपाकाचे सामान घेऊन शेतात गेले असून १५ त २० दिवस झाले भितीपोटी  गावात  न येता तेथेच राहू लागले आहे. याशिवाय काटोल, नरखेड, पारशिवणी, रामटेक, हिंगणा, उमरेड, कळमेश्वर ,सावनेर या गावात मोठ्या प्रमाणात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून त्या ठिकाणी असेच चित्र आहे. याशिवाय शहरातील अनेक उच्चभ्रू वस्त्यातील अनेक लोक  नागपूरपासून जवळत असलेल्या फार्म हाऊसवर राहण्यासाठी गेले आहे. वर्धमाननगर राठी कुटुंब गेल्या महिन्याभरापासून करोनाच्या भितीने अमरावती मार्गावरील आपल्या फार्महाऊसला राहण्यास गेले आहे. ज्या दिवशी करोना कमी होईल त्या दिवशीत शहरात येणार असल्याचे राजीव राठी यांनी सांगितले.