चंद्रपुरात तीन खासगी रुग्णालयाला कोविडची परवानगी

चंद्रपूर : अवघ्या पंधरा दिवसात २५० करोनाबाधितांचा मृत्यू झाल्यानंतर आणि प्राणवायू, व्हेंटिलेटर खाटा न मिळाल्यामुळे रुग्णवाहिका, प्रवासी निवारा व चारचाकी वाहनात बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर देखील असंवेदनशील जिल्हा प्रशासनाने सात दिवसांपासून पाच खासगी डॉक्टरांचा कोविड रुग्णालयाचा प्रस्ताव अडवून धरला होता. मात्र चोवीस तासात ३३ बाधितांचा मृत्यू होताच तीन डॉक्टरांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. तर उर्वरित दोन प्रस्ताव रात्री उशिरापर्यंत मंजूर होणार असल्याने प्राणवायूच्या १०० खाटा उपलब्ध होणार आहेत.

या जिल्ह्यात करोना संक्रमणाने कहर केला आहे. प्राणवायू व व्हेंटिलेटरसाठी बाधितांच्या नातेवाईकांची अक्षरश: धावपळ सुरू आहे. मागील सात दिवसांपासून जिल्हा प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या डॉ. चेतन खुटेमाटे यांच्या २५ खाटांच्या कोविड रुग्णालयाला बुधवारी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मंजुरी प्रदान केली. त्या पाठोपाठ डॉ. आनंद बेंडले यांचे ३० खाटांचे,  डॉ. अनुप वासाडे यांचे २० खाटांचे रुग्णालयाला मंजुरी प्रदान केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड यांनी लोकसत्ताला दिली. या प्रलंबित कोविड रुग्णालयाला तात्काळ मंजुरी द्यावी यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर यांनीही पाठपुरावा केला. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत डॉ. रोहण आईंचवार यांच्या सीएचएल रुग्णालयाला २० खाटा, डॉ. विश्वास झाडे यांच्या नर्सिंग कॉलेज मधील १०० खाटांच्या रुग्णालयला परवानगी दिली जाईल, अशीही माहिती दिली. डॉ. संजय घाटे यांच्या रुग्णालयामध्ये सेंट्रल प्राणवायू यंत्रणा बसवण्याचे काम सुरू आहे. सदर काम पूर्ण होताच त्याला देखील परवानगी दिली जाईल, असेही डॉ.राठोड म्हणाले. शहरातील आणखी काही खासगी डॉक्टरांचे प्रस्ताव आलेले आहेत. त्याला मंजुरी प्रदान करण्याचा विषय देखील आहे, असेही ते म्हणाले.

कोविड केंद्रातील कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयाच्या कोविड केंद्रामधील राहुल सुधाकर नन्हेट (२५) या कंत्राटी कामगाराचा करोनामुळे बुधवारी मृत्यू झाल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली. मागील अनेक दिवसांपासून राहुल हा कोविड केंद्रामध्ये कार्यरत होता. त्याला करोनाची बाधा होताच तिथेच उपचार सुरू होते. आज सकाळी त्याचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

अकोल्यात जि.प.चे कोविड केंद्र सुरू होणार

अकोला : जिल्ह्यात करोनाचा उद्रेक लक्षात घेता जिल्हा परिषदेकडून कर्मचारी भवन येथे ५० खाटांचे कोविड केंद्र उभारणार येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या केंद्राच्या प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला असून, प्रशासनानेही त्याला हिरवी झेंडी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अकोला जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. शहरासह ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण आहे. शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये खाटांचा तुटवडा निर्माण झाला. जिल्ह्यात प्राणवायू देखील कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जि.प.तील सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीने कर्मचारी भवनमध्ये केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याठिकाणी ५० खाटांचे कोविड केंद्र उभारणार असून, यासाठी ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य कमर्चारी, डॉक्टरांची मदत घेण्यात येणार आहे. केंद्रासाठी लागणाऱ्या खाटा, गाद्यांसह अन्य साहित्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, मदत करणाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. यावेळी वंचित आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, जि.प.अध्यक्ष प्रतिभा भोजने यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अकोल्यातील आणखी एका रुग्णालयाला दंड

अकोला : करोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना अनियमितता व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्यामुळे आणखी एका रुग्णालयाला ५० हजार रुपये दंड आकारण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. ग्लोबल रुग्णालय येथे करोनाबाधित रुग्णांवर होत असलेल्या उपचाराची जिल्हाधिकाऱ्यांनी गठित केलेल्या समितीने पाहणी करून चौकशी केली. याठिकाणी अनियमितता दिसून आल्या, तसेच शासनाकडून वेळोवेळी निर्गमित सूचनांचे पालन न केल्याचे दिसून आल्याचा अहवाल चौकशी समितीने दिला. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधित रुग्णालयाला ५० हजार रुपये दंड आकारण्याचे आदेश दिले आहेत. तसेच भविष्यात अनियमितता दिसून आल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. अनियमितता करणाऱ्या रुग्णालयांवर प्रशासनाकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे.

२४ तासांत १५,१९७ रुग्णांची भर

नागपूर : विदर्भातील अकरा जिल्ह्यांत दिवसेंदिवस करोनाची स्थिती गंभीर वळणावर जात असून मृत्यू संख्याही वाढत आहे. गेल्या २४ तासांत येथे तब्बल २८७ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून नवीन १५ हजार १९७ रुग्णांची भर पडल्याने चिंता वाढली आहे. नागपूर, यवतमाळ, चंद्रपूरला सर्वाधिक मृत्यू होत आहेत, हे विशेष.नागपूरच्या शहरी भागात दिवसभरात ५२, ग्रामीण ३८, जिल्ह्याबाहेरील ८, असे एकूण ९८ करोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाले.  तर येथे २४ तासांत ७ हजार २२९ नवीन रुग्णांची भर पडली. भंडाऱ्यात १८ रुग्णांचा मृत्यू तर १ हजार २१६ रुग्ण, अमरावतीत ९ मृत्यू तर ५२० नवीन रुग्ण, चंद्रपूरला ३३ मृत्यू तर १ हजार ५७७ रुग्ण, गडचिरोलीत २१ मृत्यू तर ५९० रुग्ण, गोंदियात १४ मृत्यू तर ६२९ रुग्ण, यवतमाळला ३९ मृत्यू तर ९२९ रुग्ण, वाशीमला ६ मृत्यू तर ३२२ रुग्ण, अकोल्यात १७ मृत्यू तर ७५४ रुग्ण, बुलढाण्यात १२ मृत्यू तर ८५८ रुग्ण, वर्धा जिल्ह्यात २० मृत्यू तर ५७३ रुग्ण आढळले. विदर्भातील एकूण मृत्यूंमध्ये नागपूर जिल्ह्यातील ३४.१४ टक्के मृत्यूंचा समावेश आहे.