News Flash

दुसऱ्या दिवशीही रस्त्यांवर वर्दळ कायम

उपद्रवी शोध पथक व अतिक्रमण विभागाचे पथक शहरात फिरत होते.

संग्रहीत

नाकाबंदी असूनही फिरणाऱ्यांवर वचक नाही

नागपूर : करोनावर नियंत्रणासाठी शहरात लागू टाळेबंदीच्या दुसऱ्या दिवशी सर्वच बाजारपेठ बंद होत्या. पण रस्त्यांवरील गर्दी कायम होती. कोणी भाजी आणण्यासाठी, कार्यालयीन कामासाठी, रुग्णालयात तर काही अत्यावश्यक सेवेत असल्याचे कारण सांगत फिरत होते. नाकाबंदी असतानाही अशा नागरिकांवर वचक नव्हता.

मंगळवारी सकाळपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता शहरातील विविध बाजारपेठांतील दुकाने बंद होती. पोलिसांनी अनेक भागात नाकाबंदी केली असली रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या सोमवारच्या तुलनेत कमी नव्हती. शहरातील प्रत्येक रस्त्यावर लोकांची वर्दळ दिसली. अनेक जण कुठल्याही अत्यावश्यक सेवेत नसताना पोलिसांना कुठलेही कारण देत घराबाहेर होते.  इतवारी, बर्डी, गोकुळपेठ, नंदनवन, महाल, सदर, प्रतापनगर आदी भागातील बाजारपेठेतील दुकाने बंद होती. अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू होती. सोमवारी दुचाकी वाहनावर दोन जण असले की रोखले जात होते. मात्र मंगळवारी असे कुणालाच रोखले जात नव्हते. उपद्रवी शोध पथक व अतिक्रमण विभागाचे पथक शहरात फिरत होते. मुखपट्टी न घालणाऱ्यांकडून दंड वसूल केला जात होता.

पोलीस-दुकानदारांमध्ये वाद

उत्तर नागपुरातील जरीपटका भागातील डेली निड्स असलेली दुकाने पोलिसांनी बंद करायला लावल्याने या भागात पोलीस आणि दुकानदारांमध्ये वाद झाला. नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा यांनी मध्यस्थी करत पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करत डेली निड्स आणि किराणा दुकाने परवानगी असल्याचे सांगत सुरू ठेवण्यास सांगितले. यानंतर व्यापाऱ्यांनी बंद केलेली दुकाने सुरू केली.

ज्येष्ठ नागरिकही मुखपट्टी विना

शहरातील उद्याने बंद असताना शहरातील विविध भागातील रस्त्यावर सकाळच्यावेळी अनेक लोक फिरताना दिसतात. वर्धमाननगर, वेस्ट हायकोट रोड, नंदनवन, व्हीआयपी रोड, के.डी. के . कॉलेज परिसर, रेशीमबाग मैदान, चिटणीस पार्क या ठिकाणी अनेक ज्येष्ठ नागरिक विनामुखपट्टी फिरत होते.

शहरबसमध्ये नियमांचा फज्जा

बस  ५० टक्के क्षमतेने सुरू असताना कोराडीवरून आलेल्या एका बसमध्ये प्रत्येक सीटवर दोन नागरिक आणि तर काही उभे असे ४० ते ५० प्रवासी होते. यावरून बसमधील प्रवाशी संख्येकडे चालक व वाहकाकंडून दुर्लक्ष केले जात आहे. ज्यांना नोकरीवर किंवा कुठे कामावर जायचे असेल ते बसमध्ये बसतात. त्यांना मुखपट्टी लावण्याबाबतच सूचना केली जाते. मात्र लोक ऐकत नाही नसल्याचे बस चालकाने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 12:07 am

Web Title: corona virus infection control in nagpur city lockdown police essential service shops akp 94
Next Stories
1 प्रादेशिक मनोरुग्णालयातही करोनाचा शिरकाव
2 एका दिवसात तब्बल १८ करोनाग्रस्तांचा मृत्यू
3 वेळापत्रक जाहीर; मात्र परीक्षा ‘अ‍ॅप’चा पत्ताच नाही!
Just Now!
X