News Flash

करोनायोद्धेच लसप्रतीक्षेत!

९ मेपर्यंत राज्यात १ कोटी २१ लाख ४१० सामान्य नागरिकांनी लशीची पहिली तर त्यातील २० लाख ६७ हजार १९० व्यक्तींनी दुसरी मात्रा घेतली.

|| महेश बोकडे

४१ टक्के आरोग्य, ५९ टक्के आरोग्येतर कर्मचारी दुसऱ्या मात्रेपासून वंचित

नागपूर : राज्यात तीव्र लसटंचाई असून, सुमारे २१ लाख लसलाभार्थी दुसऱ्या मात्रेच्या प्रतीक्षेत आहेत. त्यात ४१ टक्के आरोग्य आणि ५९ टक्के आरोग्येतर कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची बाब उघडकीस आली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, ९ मे २०२१ पर्यंत राज्यात ११ लाख २७ हजार ३४१ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लशीची पहिली मात्रा घेतली असून, त्यातील ६ लाख ६८ हजार ९०१ जणांना दुसरी मात्रा मिळाली. आरोग्येतर क्षेत्रातील १५ लाख ४ हजार ५७८ कर्मचाऱ्यांनी पहिली, तर ६ लाख १९ हजार ६२२ जणांनी लशीची दुसरी मात्रा घेतली. त्यामुळे पहिली मात्रा घेतलेल्या एकूण आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी ५९ टक्के आणि ४१ टक्के आरोग्येतर कर्मचाऱ्यांनाच दुसरी मात्रा मिळाली आहे. उर्वरित कर्मचारी प्रतीक्षायादीत आहेत.

९ मेपर्यंत राज्यात १ कोटी २१ लाख ४१० सामान्य नागरिकांनी लशीची पहिली तर त्यातील २० लाख ६७ हजार १९० व्यक्तींनी दुसरी मात्रा घेतली. पहिली मात्रा घेणाऱ्यांत १८ ते ४४ वर्षे वयोगटातील ५ लाखाच्या जवळपास नागरिकांचा समावेश आहे. त्यांच्या दुसऱ्या मात्रेची वेळ यायची आहे. राज्यात ९ मेपर्यंत सर्वच गटांतील १ कोटी ४७ लाख ३२ हजार ३२९ व्यक्तींनी लशीची पहिली मात्रा तर ३३ लाख ५५ हजार ७१३ व्यक्तींनी दुसरी मात्रा घेतली आहे. म्हणजेच एक कोटीहून अधिक जण हळूहळू दुसऱ्या मात्रेच्या प्रतीक्षायादीत येतील. मात्र, त्यातील सुमारे २१ लाख नागरिकांच्या दुसऱ्या मात्रेची वेळ आली किंवा आधीच उलटून गेली आहे. त्यात कोव्हॅक्सिनच्या सुमारे साडेपाच लाख तर, कोव्हिशिल्डच्या १६ लाख लसलाभार्थींचा समावेश आहे.

दुसऱ्या मात्रेस प्राधान्य देण्याची केंद्राची सूचना

नवी दिल्ली : लससाठ्याचा दुसऱ्या मात्रेसाठी प्राधान्याने वापर करावा, अशी सूचना केंद्राने राज्यांना केली आहे. लशीची दुसरी मात्रा देण्याची वेळ आलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी केंद्राकडून मिळालेल्या लशींपैकी ७० टक्के साठा राखीव ठेवावा, असे केंद्राने म्हटले आहे. म्हणजेच उर्वरित ३० टक्के लसमात्राच पहिली मात्रा घेणाऱ्यांसाठी ठेवण्यात येणार आहेत.

२ लाख ७५ हजार कोव्हॅक्सिन लशी दुसऱ्या मात्रेसाठीच

मुंबई : केंद्राकडून अपुरा साठा मिळाल्याने राज्यात सध्या ४५ वर्षांवरील सुमारे साडेपाच लाख नागरिक कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या मात्रेच्या प्रतीक्षेत आहेत. या नागरिकांना आता काहीसा दिलासा मिळण्याचे संकेत आहेत. राज्याने १८ ते ४४ वयोगटासाठी खरेदी केलेल्या कोव्हॅक्सिन लशीच्या २ लाख ७५ हजार मात्रांचा वापर दुसरी मात्रा देण्यासाठीच केला जाणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी जाहीर केले.

लस तुटवड्यामुळे अनेक नागरिकांना दुसरी मात्रा मिळवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने आता राज्यातील सर्वच लसीकरण केंद्रावर दुसरी मात्रा घेणाऱ्यांना प्राधान्य देण्याची सूचना केली आहे. मुबलक लशी मिळताच सर्वांचे झटपट लसीकरण केले जाईल. – डॉ. अर्चना पाटील, संचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2021 1:21 am

Web Title: corona virus infection corona fighter waiting corona vaccine akp 94
Next Stories
1 १६ रुग्णालयांत प्राणवायू प्रकल्पासाठी प्रयत्न
2 स्थानिकांच्या तुलनेत बाहेरच्या कंपन्यांची मदत अधिक
3 Coronavirus : नवीन करोनाग्रस्तांहून तिप्पट करोनामुक्त!
Just Now!
X