नागपूर : करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून आवश्यक औषधांसह प्राणवायू उपलब्ध केला जात आहे. केंद्र सरकारकडून राज्याला तीनपट प्राणवायूची सोय ठेवण्याची सूचना असून त्यानुसारही काम सुरू आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली.

सोमवारी नागपुरातील पत्रकारांशी ते बोलत होते. राज्याची प्राणवायू उपलब्धतेची क्षमता साडेबाराशे टनाची होती. केंद्र सरकारने पाचशे टनापर्यंत मदत केली. आता आपण १,८०० मेट्रिक टन उत्पादनापर्यंत पोहचलो आहे. आता तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून तीनपट प्राणवायूची तयारी राज्याने करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार राज्य शासनाकडून गांभीर्याने प्रयत्न सुरू आहेत. सोबत करोनाची तिसरी लाट आल्यास रेमडेसिविरसह इतर औषधांची आवश्यक उपलब्धताही केली जात आहे. तूर्तास आपल्याकडे रेमडेसिविर तीन ते चार पट उपलब्ध आहे. सोबत अन्न व औषध प्रशासन खाते सातत्याने विविध कंपन्यांच्या संपर्कात आहेत. सर्व कंपन्यांना उत्पादन वाढवले पाहिजे, कच्च्या मालाची अडचण असल्यास शासनाला सूचना करण्यास सांगण्यात आले आहे.

ही माहिती उपलब्ध होताच शासन संबंधित कंपनीला मदत करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचेही शिंगणे म्हणाले. सोबत उद्योग विभागच्या माध्यमातून प्राणवायूचे नवीन प्रकल्प तयार करण्याचे काम सुरू आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान जे रुग्ण अतिदक्षता विभागात होते. त्यांना प्राणवायू लागले होते. त्यातील काहींमध्ये म्युकरमायकोसिससह इतरही करोना पश्चात आजार आढळले. त्यावेळी एम्फोटेरेसिन इंजेक्शनची कमी होती. त्याबद्दल आता तयारी सुरू असून डॉक्टरांनी काढलेल्या वेगवेगळ्या निष्कर्षानुसारही शासन पूर्ण काळजी घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.