२४ तासांत ७३ मृत्यू; ५,५७७ नवीन रुग्ण

नागपूर : जिल्ह्यात गुरुवारी करोनाग्रस्तांच्या मृत्यूने अक्षरश: तांडव घातले. २४ तासांत तब्बल ७३ रुग्णांनी प्राण गमावले. याशिवाय ५ हजार ५७७ नवीन रुग्णांची भर पडली. शहरात २४ तासांत ४०, ग्रामीण २८, जिल्ह्याबाहेरील ५ असे एकूण ७३ मृत्यू झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या ३ हजार ४९८, ग्रामीण १ हजार १८६, जिल्ह्याबाहेरील ८९३ अशी एकूण ५ हजार ५७७ रुग्णांवर पोहचली.  दिवसभरात शहरात २ हजार ८८१, ग्रामीण २ हजार ६२८, जिल्ह्याबाहेरील ५ असे एकूण ५ हजार ५ हजार ५१४ नवीन करोनाग्रस्त आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची संख्या १ लाख ९९ हजार ६१४, ग्रामीण ५९ हजार ४६, जिल्ह्याबाहेरील १ हजार ७५ अशी एकूण २ लाख ५९ हजार ७३५ रुग्णांवर पोहचली.  दिवसभरात शहरात २ हजार १६५, ग्रामीण १ हजार ११२ असे एकूण ३ हजार २७७ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या १ लाख ६७ हजार १३७, ग्रामीण ४१ हजार ९२४ अशी एकूण २ लाख ९ हजार ६१ व्यक्तींवर पोहोचली आहे.

‘व्हेंटिलेटर’, खाटांअभावी दोघांचा मृत्यू

शहरातील सर्व शासकीय, खासगी रुग्णालयांचे उंबरठे झिजवूनही खाटा न मिळाल्याने रुग्णवाहिकेमध्येच एका तरुणाला जीव गमवावा लागल्याची बातमी ताजी असतानाच गुरुवारी  पुन्हा ‘व्हेंटिलेटर’न मिळाल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकाचा मृत्यू झाला. प्रकृती खालावल्यामुळे त्याला चंद्रपूरवरून नागपूरला आणत मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, मेडिकल, एम्स आणि खासगी रुग्णालयांमध्ये प्रयत्न करूनही ‘व्हेंटिलेटर’ न मिळाल्याने अखेर त्याचा जीव गेला. या सर्व गैरसोयीला जबाबदार कोण, असा सवाल विद्यार्थी चळवळीचे कार्यकर्ता वैभव बावणकर यांनी उपस्थित करीत वर्षभरापासून प्रशासन सुविधा उपलब्ध करू शकत नसेल तर त्यांच्या आजवरच्या अनुभवाचा उपयोग काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान,  मेडिकलमध्ये ११३ तर मेयोतही जवळपास एवढेच व्हेंटिलेटर करोना  रुग्णांसाठी आहेत. परंतु दोन्ही रुग्णालयांत गंभीर  रुग्ण वाढल्याने जवळपास सर्व व्हेंटिलेटर वापरात आहेत. परिणामी, अनेक रुग्ण व्हेंटिलेटरच्या प्रतीक्षेत आहे. प्रशासनाकडून काहींना हाय फ्लो ऑक्सिजन लावून तर काहींना हाताने दाब देऊन श्वास पुरवला जात आहे.

विदर्भात करोनाचे १२० बळी

विदर्भातील अकरा जिल्ह्यांत २४ तासांत १२० करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून नवीन १० हजार ५६५ रुग्णांची भर पडली. दुसऱ्या लाटेत प्रथमच गोंदियाला ५ मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. नागपूर शहरात सर्वाधिक ४०, ग्रामीण २८, जिल्ह्याबाहेरील ५ असे एकूण जिल्ह्यात ७३ मृत्यू झाले. विदर्भाच्या एकूण मृत्यूच्या तुलनेत हे ६०.८३ टक्के होते. तर नागपूर जिल्ह्यात ५ हजार ५१४ नवे बाधित आढळले. वाशीम जिल्ह्यात ३ मृत्यू तर २१३ रुग्ण, अकोल्यात ३ मृत्यू तर २९८ मृत्यू, भंडाऱ्यात ३ मृत्यू तर १ हजार ४२ रुग्ण, गडचिरोलीत २ मृत्यू तर २१९ रुग्ण, चंद्रपूरला ९ मृत्यू तर ६६८ रुग्ण, यवतमाळला ६ मृत्यू तर ५५६ रुग्ण, अमरावती ५ मृत्यू तर ३७८ रुग्ण, गोंदियात ५ मृत्यू तर ५७६ रुग्ण, बुलढाण्यात ४ मृत्यू तर ६०६ रुग्ण, वर्धा ७ मृत्यू तर ४९५ रुग्ण आढळले. दरम्यान गेल्या अनेक महिन्यानंतर विदर्भात प्रथमच सर्व ११ जिल्ह्यांत मृत्यू नोंदवले गेले आहेत, हे विशेष.

सर्वच शासकीय कार्यालयात प्रवेशबंदी

करोना संसर्गवाढीमुळे शासनाने जाहीर केलेल्या नवीन नियमावलीनुसार नागपूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना ३० एप्रिलपर्यंत प्रवेशबंदी करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी यासंदर्भात आदेश काढले आहेत. नागरिकांना  काही कामे असेल तर त्यांनी आपले अर्ज, तक्रार ऑनलाईन स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी महापालिका, जिल्हा परिषद, सुधार प्रन्यास कार्यालयाने नागरिकांना प्रवेशबंदी केली होती. आता ती सरसकट सर्व शासकीय कार्यालयांसाठी करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना त्यांची कामे घेऊन कार्यालयात जाता येणार नाही. कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही पूर्वी कामे होत नव्हती, आता तर कर्मचाऱ्यांना करोनाचे निमित्तच मिळाले आहे. त्यामुळे महत्त्वाची कामे आणखी प्रलंबित राहतील, अशी संतप्त प्रतिक्रिया या निर्णयाबाबत सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.  जिल्ह्यातील १२ दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणीचे कामही ऑनलाईन करण्यात आले आहे.

‘विशेष घटक- विशिष्ट दिवस’ मोहिमेला प्रारंभ

शहरात करोनाचा वाढता संसर्ग कमी करण्यासाठी महापालिकेद्वारे लसीकरणावर भर दिला जात असून करोना साखळी तोडण्यासाठी विविध उपाययोजनाही राबवल्या जात आहेत. महापालिकेतर्फे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांसाठी लसीकरणाच्या ‘विशेष घटक- विशिष्ट दिवस’ अभियानाला सुरुवात करण्यात आली. गुरुवारी पहिल्या दिवशी ‘चालक दिवसा’ला २०० च्यावर वाहन चालकांनी लसीकरणाचा लाभ घेतला.

सक्रिय करोनाग्रस्तांची संख्या ४५ हजारांवर

शहरात २९ हजार ७२१, ग्रामीण १५ हजार ३७६ असे एकूण ४५ हजार ९७ सक्रिय  रुग्ण आहेत. त्यातील गंभीर संवर्गातील ६ हजार ८२ रुग्णांवर विविध कोविड रुग्णालय, कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. ही संख्या जिल्ह्यात प्रथमच सहा हजारांपुढे गेली आहे.  गृह विलगीकरणात ३९ हजार १५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

२९ टक्के अहवाल सकारात्मक

शहरात दिवसभरात ९ हजार ५९५, ग्रामीण ९ हजार ५८१ अशा एकूण १९ हजार १७६ चाचण्या झाल्या. त्यांचे अहवाल शुक्रवारी अपेक्षित आहेत.  बुधवारी तपासलेल्या जिल्ह्यातील १९ हजार १९१ नमुन्यांत ५ हजार ५७७ रुग्णांना करोना असल्याचे स्पष्ट झाले. सकारात्मक अहवालाचे प्रमाण २९ टक्के आहे.