|| प्रशांत देशमुख

मृत करोनाग्रस्तांच्या नातेवाईकांची मागणी; दहावा, तेरावा, उदकशांतीसाठी अव्वाच्या सव्वा वसुली

वर्धा : करोना व्याधीने झालेला आकस्मिक मृत्यू कुटुंबाला विदीर्ण करणारा असतो. तरीही परंपरेपोटी मृत्यूपश्चात होणारे संस्कार बहुतांश कुटुंबांना करावेच लागतात. मात्र अशी संस्कार पूजा करताना भटजींकडून आकारल्या जाणाऱ्या अव्वाच्या सव्वा दक्षिणेमुळे अनेक कुटुंबांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे  रुग्णालयांप्रमाणे भटजींच्या दक्षिणेवरही शासनाचे नियंत्रण हवे, अशी मागणी  मृत करोनाग्रस्तांचे नातेवाईक करीत आहेत.

करोनाच्या पहिल्या टप्प्यात मृत्यूचे प्रमाण कमी होते. दुसऱ्या टप्प्यात मात्र मृतांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली. सोबतच मृतात्म्यास शांती मिळावी म्हणून  दहावा व तेरावा दिवस तसेच उदकशांतीच्या पूजेचे प्रमाणही वाढले. परंतु, या तीनही दिवसाच्या संस्कारपूजेचा  दर पाच ते पंचवीस हजारापर्यंत जाऊन पोहोचला आहे. नदीवरील पूजेचे चक्क पाच हजार रुपये घेतले जात आहेत.  एरवी हे दर दोन ते दहा हजारापर्यंतच होते. एकाच दिवशी दोन किंवा जास्त कुटुंबात पूजेला जायचे असल्यास सकाळ ते संध्याकाळ दरम्यान वेगवेगळा मुहूर्त दिला जातो. पर्यायाने अधिक दर देणाऱ्या कुटुंबाला प्राधान्याने वेळ मिळतो.

वर्धा येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार प्रक्रिया पार पाडणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचे दिलीप तिवारी म्हणाले, पहिल्या लाटेत भीतीपोटी मृताचे नातलग येत नव्हते. दुसऱ्या लाटेत मात्र दहनप्रसंगी, अस्थी गोळा करण्यासाठी व पुढील पूजा करण्यासाठी  नातलग येत आहेत. त्यासाठी दहनाची जागा राखून ठेवली जाते. पूजेच्या वाढत्या दराबाबत भाष्य करण्यास येथील प्रसिद्ध पुरोहित महेंद्र शास्त्री पाचखेडे यांनी नकार दिला. ते म्हणाले, आम्ही करोना व अन्य मृत्यू असा भेद मुळीच करीत नाही. करोनाने मृत्यू झालेल्या कुटुंबात जर अन्य कुणी बाधित असेल तर पूजा पंधरा दिवसानंतर करण्याचा सल्ला देतो. मित्राला आलेला अनुभव सांगणारे नागरी कृतिदलाचे गिरीश काशीकर म्हणाले, भटजींचे पूजेचे दर सामान्यांसाठी महागडे ठरत आहेत. पूजा करावी की करू नये, ही ऐच्छिक बाब असली तरी दरावर नियंत्रण असले पाहिजे. रुग्णालयाचे दर  शासनाने ठरवून दिले आहे त्याप्रमाणेच पूजेचे दरही ठरवून देता येणार नाही का, असा सवाल काशीकर यांनी केला.