व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे हिवाळी-२०२१ परीक्षेचे शुल्क माफ करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. अनेक दिवसांपासून परीक्षा शुल्क माफ करण्याच्या मागणीवर आज मंगळवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये  शिक्कामोर्तब करण्यात आले. विशेष म्हणजे, उन्हाळी परीक्षांचे शुल्क विद्यापीठाकडे आधीच जमा झाल्याने पुढे येणाऱ्या हिवाळी परीक्षेचे शुल्क माफ करण्याचा निर्णय झाला आहे.

करोना आणि टाळेबंदीमुळे पालकांची आर्थिक स्थिती ढासळल्यामुळे विद्यापीठाने शुल्क माफ करावे, अशी मागणी सर्वच स्तरातून होत होती. यासाठी विविध विद्यार्थी संघटनांनीही विद्यापीठाला निवेदन दिले होते.

मागील वर्षापासून विद्यापीठाच्या सर्व परीक्षा  ऑनलाईन सुरू आहेत. परीक्षा शुल्कापोटी विद्यापीठाकडे कोट्यवधी रुपये जमा होतात. ऑनलाईन परीक्षांमुळे विद्यापीठाचा परीक्षा खर्च हा निम्म्याहूनही कमी झाला आहे. असे असतानाही विद्यापीठ पूर्ण परीक्षा शुल्क आकारत असल्याने टीका होत होती. त्यामुळे व्यवस्थापन परिषदेमध्ये परीक्षा शुल्क माफीसंदर्भात मंगळवारी चर्चा करण्यात आली असून शुल्क माफीला सर्वांनी मान्यता दिली. त्यामुळे येणाऱ्या हिवाही २०२१ परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांकडून कुठलेही शुल्क वसूल होणार नाही. या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.

महाविद्यालयांच्या शुल्काबाबतही चौकशी

करोनामुळे दीड वर्षापासून महाविद्यालये बंद असतानाही विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारचे अनावश्यक शुल्क आकारले जात आहेत. यालाही सर्वच स्तरातून प्रचंड विरोध होत आहे. त्यासाठी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. मिलिंद बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. त्यात डॉ. नितीन कोंगरे, विष्णू चांगदे आणि इतरांचा समावेश आहे. ही समिती महाविद्यालयांच्या शुल्कासंदर्भात चौकशी करून ती कमी करण्यासंदर्भात अहवाल तयार करणार आहे. ही समिती येत्या १०-१२ दिवसांत  विद्यापीठाला आपला अहवाल सादर करेल.