शाळा, महाविद्यालये, आठवडी बाजार; धार्मिक-राजकीय सभा ७ मार्चपर्यंत बंद;  बाजारपेठाही शनिवार, रविवारी उघडणार नाहीत; ‘हॉटस्पॉट’वर अधिक लक्ष, कोविड सेंटर पुन्हा सुरू होणार

नागपूर : करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता शहर व जिल्ह्यात टाळेबंदी ऐवजी कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार शाळा, महाविद्यालये आणि खासगी शिकवणी वर्ग, प्रशिक्षण संस्था, ७ मार्चपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. या काळात ऑनलाईन वर्ग सुरू राहतील. आठवडी बाजार,धार्मिक व राजकीय सभांवरही बंदी घालण्यात आली असून इतर शहरातील इतर बाजारपेठाही शनिवार व रविवारी बंद राहणार आहेत. २५ फेब्रुवारीपासून मंगल कार्यालये व लॉन्सवर सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी नागपूर शहर आणि जिल्ह्यातील करोना ससंर्गवाढीचा आढावा घेतला. जिल्ह्यात टाळेबंदी लागू करणार नाही, पण करोना प्रतिबंधक नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले. करोना चाचण्यांची संख्या वाढवतानाच बाधितांच्या  संपर्कात येणाºयांचा शोध अधिक घेतला जाणार आहे. गर्दीमुळे संसर्ग वाढत असल्याने २५ फेब्रुवारीपासून मंगल कार्यालय, लॉन्समध्ये कार्यक्रम घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच आठवडी बाजार, धार्मिक आणि राजकीय सभांवर सात मार्चपर्यंत प्रतिबंध टाकण्यात आला आहे. शहरातील इतर बाजारपेठाही  शनिवारी, रविवारी बंद राहणार आहेत. खाद्य पुरवठ्यासह इतरही ऑनलाईन सेवेला निर्बंधातून वगळण्यात आले आहे. शहर व जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये तसेच खासगी शिकवणी वर्ग, प्रशिक्षण  संस्था २२ पासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राऊत यांनी सांगितले.

रुग्णसंख्या अधिक असलेले भाग बाधित क्षेत्र घोषित करून तेथील जबाबदारी संबंधित अधिकाºयांवर सोपवली जावी तसेच खासगी रुग्णालयात रुग्णाची करोना चाचणी करताना रुग्णाचे नाव, पत्ता व दूरध्वनी क्रमांक  नोंदवून घ्यावे, तसेच बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची संपूर्ण माहिती घ्यावी, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केली.

या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. अमितेश कुमार, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजेश सिंह, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय  केवलिया, डॉ. राजेश गोसावी, डॉ. महमद फजल, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी  रवींद्र खजांजी उपस्थित होते.

शहरातील नवे ‘हॉटस्पॉट’

शहरात जरीपटका, जाफरनगर, फ्रेण्डस् कॉलनी, न्यू बीडीपेठ, स्वावलंबीनगर, खामला सिंधी कॉलनी, दिघोरी, वाठोडा, लक्ष्मीनगर, अयोध्यानगर येथे करोनाबाधितांची संख्या अधिक आहे, असे महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले. ज्या ठिकाणी पाच रुग्ण आहेत, तेथे इमारत तर वीसपेक्षा अधिक रुग्ण असेल तर तो परिसर ‘सील’ करण्यात येत आहे. गृहविलगीकरणातील रुग्ण बाहेर आढळल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रदर्शनाला २५ हजारांचा दंड

महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी  चिटणवीस सेंटर, सिव्हिल लाईन्समध्ये ए.आर.जी. क्रिएशन प्रदर्शनला करोना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल २५ हजारांचा दंड  केला. क्रिएशनचे अंकित अग्रवाल यांनी शोध पथकाला दंडापोटी २५ हजारांचा धनादेश दिला. उपद्र्रव शोध पथकाला गुप्त सूचना मिळाली की, चिटणवीस सेंटर येथे आयोजित प्रदर्शनामध्ये मोठ्या संख्येने नागरिक खरेदीसाठी आले आहेत. करोना नियमांचा भंग केला जात आहे. त्यामुळे शोध पथकाचे प्रमुख बिरसेन तांबे यांनी  ताबडतोब कारवाईचे निर्देश दिले.

नैवेद्यम इस्टोरियाला टाळे 

महापालिकेच्या लकडगंज झोन कार्यालयाने कळमना रोड येथील नैवेद्यम इस्टोरिया मंगल कार्यालयाला १० मार्चपर्यंत टाळे ठोकले आहे. या मंगल कार्यालयात करोनाचे ८ रुग्ण मिळाले होते.  यामध्ये स्वयंपाककाम करणाऱ्या कर्मचाºयांचाही समावेश आहे. या परिसराला बाधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

  •   ‘मी जबाबदार’  मोहीम प्रभावीपणे राबवणार.
  •     शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग ७ मार्चपर्यंत बंद
  •    अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठा शनिवार व रविवारी बंद
  •    रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने रात्री ९ पर्यंत सुरू ठेवणार
  •    लग्न, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांना  ७ मार्चपर्यंत बंदी
  • मंगल कार्यालय/ लॉन्स/रिसॉर्ट २५ फेब्रुवारीपासून ७ मार्चपर्यंत बंद