२४ तासांत १५ मृत्यू; ५३६ नवीन रुग्ण

नागपूर : जिल्ह्यात गेल्या बेचाळीस दिवसानंतर आज गुरुवारी पहिल्यांदा ५३५ रुग्ण आढळले. याशिवाय दिवसभरात १५ रुग्णांचा मृत्यू झाल्याने सर्वसामान्य नागरिकांत पुन्हा भीती पसरली आहे. आजपर्यंतच्या जिल्ह्यातील मृत्यूसंख्याही ३,७०७ वर पोहचली आहे.

नागपूर जिल्ह्यात २२ ऑक्टोबर २०२० रोजी ६०२ नवीन करोनाबाधित  आढळले होते. त्यानंतर ४२ दिवसांनी  गुरुवारी ५३५ नवीन बाधित आढळले आहे. नवीन रुग्णांत शहरातील ४४१, ग्रामीण ९२, जिल्ह्याबाहेरील ३ रुग्णांचा समावेश आहे.  २४ तासांत  सर्वाधिक ७ मृत्यू शहरात, ५ ग्रामीणमध्ये, ३ जिल्ह्याबाहेरच्यांचे झाले. त्यामुळे आजपर्यंत शहरातील दगावणाऱ्यांची संख्या २ हजार ५५०, ग्रामीण ६४०, जिल्ह्याबाहेरील ५१७ अशी एकूण ३ हजार ७०७ वर पोहचली आहे.

दरम्यान, शहरात गुरुवारी ४ हजार ६२५, ग्रामीणला ८०० असे एकूण ५ हजार ४२५ सक्रिय  रुग्ण होते. त्यातील १ हजार ३३ रुग्णांवर विविध रुग्णालयांत तर ३ हजार ८५६ रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत.

करोनामुक्तांचे प्रमाण घसरले

शहरात गेल्या काही दिवसांपासून रोज करोनामुक्तांहून नवीन करोनाबाधितांची संख्या अधिक होत आहे. आज शहरात २७०, ग्रामीणला ३७ असे एकूण ३०७ करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ८२ हजार ३८८, ग्रामीण २१ हजार ७४९ अशी एकूण १ लाख ४ हजार १३७ वर पोहचली आहे. आजपर्यंतच्या बाधितांच्या तुलनेत करोनामुक्तांचे प्रमाण ९१.९४ टक्के आहे.