करोनाग्रस्त डॉक्टरांचे मेडिकल, मेयोला साकडे

नागपूर :  शहरात रेमडेसिवीरचा आवश्यक साठा आहे. पण, खबरदारी म्हणून हे इंजेक्शन औषधालयातून न विकता थेट रुग्णालयातच पुरवण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने काढला. परंतु खासगी रुग्णालयांत हे इंजेक्शन नसल्याने ते मिळवण्यासाठी अनेकांची फरफट होत आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील करोनाग्रस्त डॉक्टरांकडूनही  रेमडेसिवीर उपलब्ध असलेल्या मेडिकल, मेयोतील अधिकाऱ्यांना तेथे दाखल करण्याची विनंती केली जात आहे.

करोनाचे अत्यवस्थ  रुग्ण वाढल्याने अचानक रेमडेसिवीरचा वापर वाढला आहे. हे इंजेक्शन मिळत नसल्याने  करोनाग्रस्त डॉक्टर, अधिकाऱ्यांचे मेडिकलच्या अधिकाऱ्यांना   संपर्क करण्याचे प्रमाण वाढले आहे. आधीच मेडिकलवर एवढ्या रुग्णांचा  ताण आहे व त्यातच  या सगळ्यांना रेमडेसिवीर उपलब्ध करण्यासाठी  मेडिकलचे अधिकारी प्रयत्न करत आहेत. परंतु इतर सामान्य रुग्णांची मात्र या इंजेक्शनंसाठी खूपच फरफट होत आहे. या वृत्ताला मेडिकल, मेयोतील काही अधिकाऱ्यांनी नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला आहे.

जिल्ह्यातील रेमडेसिवीरची स्थिती

सूत्रांच्या माहितीनुसार, जिल्ह्यात ८ एप्रिलला मायलेन कंपनीचे २२ हजार ७५०,  सिप्ला कंपनीचे ६ हजार आणि हेट्रो कंपनीच्या १३ हजार रेमडेसिवीर  इंजेक्शन  रात्री उशिरापर्यंत मिळण्याची आशा व्यक्त केली गेली.  इतरही काही इंजेक्शन विविध रुग्णालयांच्या साठ्यात असल्याचा दावा एका अधिकाऱ्याने केला.