रस्त्यावरील गर्दीने प्रशासनाचा दावा फोल; बंदीतून अनेक क्षेत्र वगळल्याने पोलिसांचा नाईलाज

नागपूर : करोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी सोमवारपासून लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीदरम्यान नुसते दुकानांनाच टाळे दिसले. नागरिकांवर बंदी आहे, असे फारसे जाणवलेच नाही. टाळेबंदीच्या पहिल्या दिवशी रस्त्यावर सर्वत्र गर्दी दिसून आली. तरीही जिल्हा प्रशासनाने मात्र टाळेबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचा दावा केला.

शहरातील मुख्य बाजारपेठा बंद असल्यातरी एस.टी., शहर बस, मेट्रो, रेल्वे व विमान सेवा सुरू असल्याने रेल्वे, बस व शहर बसस्थानकांवर बाहेरगावी जाणाऱ्यांची गर्दी दिसून आली. लसीकरण केंद्रांची स्थिती यापेक्षा वेगळी नव्हती. सरकारी कार्यालये मर्यादित स्वरूपात सुरू असल्याने सकाळी कर्मचाऱ्यांची वाहने रस्त्यांवर धावत होती. सकाळच्या सत्रात सिग्नलपुढे थांबलेल्या वाहनांची गर्दी चौका-चौकात तैनात पोलीस नाईलाजाने बघत होते. मुख्य रस्त्यांवर काही प्रमाणात वर्दळ कमी असली तरी वस्त्यांवस्त्यांधील  रस्त्यांवर फिरणारे कमी नव्हते. गर्दीमुळे करोनाचा संसर्ग वाढतो असे सांगितले जात असले तरी सर्वाधिक गर्दी ही किराणा आणि भाजीच्या दुकानात होती.

सहकारनगरात प्रभातफे रीचा उत्साह कायम

सिव्हिल लाईन्स परिसरातील ‘वॉकर्स स्ट्रीट’ प्रमाणेच सहकारनगर घाटासमोरून विमानतळाकडे जाणाऱ्या हिरव्यागार रस्त्यावर प्रभातफे रीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या अलीकडच्या काही वर्षात वाढली आहे. मागील टाळेबंदीला थोडफार प्रतिसाद देणाऱ्या नागरिकांनी आठवड्याभराच्या टाळेबंदीला पहिल्याच दिवशी धुडकावून लावल्याचे चित्र सोमवारी या मार्गावर दिसून आले. सोमवारी तरुणाईसोबतच ज्येष्ठांचीही गर्दी या मार्गावर दिसून आली. एवढेच नाही तर ‘फ्लाईंग क्लब’ समोरच्या मोकळ्या जागेवर व्यायाम करणाऱ्यांची संख्याही कायम होती. या मार्गालगतच असलेल्या मंदिराच्या बाजूला खाली असलेल्या मैदानसदृश मोकळ्या जागेत दररोज बॅडमिंटन खेळणाऱ्यांच्या उत्साहात टाळेबंदीने काहीच फरक पडल्याचे दिसले नाही. सहकारनगर, खामला भाजी बाजार, प्रतापनगर या मार्गावरील दुकाने बंद असली तरीही दुचाकीवर दोघांना असणारी बंदी, मुखपट्टी सक्ती असे सर्व नियम धुडकावून लावत नागरिक फिरत होते.

मनीषनगर, श्यामनगरमध्ये टाळेबंदीचा विसर

टाळेबंदीदरम्यान शहरात सोमवारी मनीषनगर, श्यामनगरमधील दोन्ही प्रमुख मार्गावरील दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ कायम होती. मनीषनगर रेल्वे क्रॉसिंगवरील प्रतीक्षेत असलेल्या वाहनांची संख्या बघता ही टाळेबंदी आहे काय, असा प्रश्न उपस्थित होत होता. या भागातील सिमेंट रस्त्याचे आणि घरांचे बांधकाम सुरू असल्याने मजूरही या भागात फिरताना दिसत होते. पादत्राणे दुरुस्ती करण्यासाठी चार ते पाच जण एका दुकानात उभे होते. सायंकाळी रस्त्यावरील गर्दी आणखी वाढल्याचे दिसून येत होते. औषध विक्रीचे दुकान, शहाळे विकणारे, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थांच्या दुकानात दोन-तीन ग्राहक उभे असल्याचे दिसून येते होते.

खामला परिसरात रिकामटेकड्यांचा ठिय्या

खामला, पांडे  लेआऊट परिसरात दुकाने बंद होती. नागरिक रस्त्यावर फिरत होते, तेसुद्धा मुखपट्टीशिवाय. पोलीस केवळ चौकात असल्याने खामल्यातील अंतर्गत वस्त्यांमध्ये टाळेबंदीचा फज्जा उडाल्याचे चित्र होते.  खामल्यात मोठी बाजारपेठ आहे. येथील दुकानदारांनी कडकडीत बंद पाळला. केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू होती. आवश्यक खरेदीसाठी नागरिक रस्त्यांवर फिरत होते. विशेष म्हणजे, करोनाविषयक नियमांचा विसर नागरिकांना पडल्याचे दिसले. बहुतांश लोकांनी मुखपट्टी लावलेली नव्हती. तर दुचाकीवर एकाच व्यक्तीला परवानगी असताना दोन जण दुचाकीवर फिरताना आढळले. रिकामटेकडे आणि हुल्लडबाज युवकांचा बंद पान ठेल्यांसमोर ठिय्या दिसून आला.  ऑरेंज सिटी हॉस्पिटल चौकात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. मात्र पोलीस केवळ एका ठिकाणी बसून होते. रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना पोलीस विचारत नसल्याने चांगलीच रहदारी होती.

वर्धा मार्गावर वर्दळ कमी

टाळेबंदीच्या पहिल्या दिवशी वर्धा मार्गावर चिंचभवन चौक ते छत्रपती चौक, उड्डाण पूल व परिसरातही एरवीपेक्षा कमी वर्दळ दिसून आली. सकाळी कार्यालयीन कामकाजासाठी निघणाऱ्यांमुळे रस्त्यावर व आवश्यक वस्तूंच्या दुकानात दैनंदिन खरेदीसाठी गर्दी होती. दुपारनंतर ती रोडावली. आवश्यक वस्तूंचा अपवाद सोडला तर इतर दुकाने बंद होती. काहींनी उघडण्याचा प्रयत्न केला. पण पोलीस गस्तीनंतर ती बंद झाली. मुख्य रस्त्यावर दुपारनंतर बाहेरून येणारी वाहने सोडली तर कामानिमित्त बाहेर पडणारी मोजकीच वाहने दिसून आली. शहराबाहेरून आलेल्या वाहनांची तपासणी पोलिसांकडून केली जात होती. मुखपट्ट्या बांधल्या आहेत किंवा नाही हे पाहिले जात होते. हॉटेल प्राईडजवळ महापालिकेचे व पोलिसांचे पथक तैनात होते. उड्डाण पुलावरही शुकशुकाट होता. अजनी चौक, नीरी हायस्कूल या भागात किंचित वर्दळ दिसून आली. मेट्रोतील प्रवासी संख्या मात्र रोडावलेली होती.  विविध वस्त्यांमध्ये नागरिक घरीच थांबलेले होते. दुपारी चारनंतर मात्र तेही बाहेर पडले.

रेल्वेस्थानक गजबजलेलेच

रेल्वेस्थानकावर प्रवाशांची नेहमीसारखी वर्दळ दिसून आली. टाळेबंदीतही विशेष गाड्या सुरू आहेत. परंतु नागपुरातील टाळेबंदीची बातमी सर्वदूर पसरल्याने सोमवारी येणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण कमी होते. पण जाणाऱ्यांची संख्या सर्वसाधारण होती. प्रवाशांना घेण्यासाठी ऑटोरिक्षा चालकांना परवानगी होती.   शिवाय एका ऑटोरिक्षात केवळ दोन प्रवासी घेण्याचे बंधन असल्याने व्यवसाय करणे अवघड झाल्याचे रेल्वेस्थानावरील ऑटोरिक्षा चालक म्हणाले. यासंदर्भात रेल्वे अधिकारी म्हणाले, नागपूरहून मुंबई आणि पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांवर टाळेबंदीचा परिणाम दिसून आला. परंतु नागपूरमार्गे उत्तर ते दक्षिण भारताकडे जाणाऱ्या गाड्यांवर परिणाम दिसला नाही.

इंदिरा गांधी रुग्णालयात लसीकरणासाठी रांगा

धरमपेठेत टाळेबंदीच्या नावावर केवळ दुकानेच बंद होती. रस्त्यावर मात्र लोकांची वर्दळ नेहमीसारखीच दिसून आली. सायंकाळी गर्दीत वाढ झाली. धरमपेठ, गोकुलपेठ परिसरात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे येथे नियमित वर्दळ असते. करोनामुळे ती सोमवारी कमी असली तरी लोकांची गर्दी होतीच. टाळेबंदीमधून लसीकरण वगळण्यात आले होते. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी दिसून आली. गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयात लसीकरणासाठी रांगा लागल्या होत्या.