|| राम भाकरे

अंत्ययात्रेसाठी खांदेकरही सापडत नाहीत

नागपूर : मृत्यूनंतरचे कर्म हे श्रद्धापूर्वक आणि विधीवत केल्यास मृत व्यक्तीचा देह भूलोकात किंवा मृत्यूलोकात न अडकता, त्याला सद्गती मिळून तो पुढच्या लोकांत जाऊ  शकतो, असे सांगितले जाते. मृत माणसाच्या देहाला सद्गती मिळावी, यासाठी प्रार्थना करायला त्याचे आप्तस्वकीय त्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळेस एकत्र येतात. परंतु करोनामुळे ही प्रार्थनाही दुर्लभ झाली आहे. असाच एक अनुभव नागपुरात आला.

सरकारने अंत्यसंस्कारासाठी २० लोकांना एकत्र येण्याची परवानगी दिली असली तरी लोक अंत्ययात्रेत येत नाहीत, हे आजच्या एका घटनेवरून स्पष्ट झाले.

नागपुरातील काही ठराविक भागात अंत्यसंस्काराचे सामान मिळणारी दुकाने असली तरी त्या दुकानात जे आवश्यक सामान आहे ते मिळेनासे झाले आहे. शिवाय शिडी बांधण्यासाठी आणि घरून अंत्यसंस्कारासाठी घाटावर जाण्यापर्यंत लोक येत नसल्यामुळे पार्थिव वाहनातच आणले जात आहे. अंबाझरी घाटावर  महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याशी संवाद साधला असताना त्याने सांगितले, गेल्या पाच सहा दिवसांत दोन ते तीन पार्थिव अंत्यसंस्कारासाठी आले. मात्र या अंत्ययात्रेत बोटावर मोजण्याइतके लोकच होते.  यात चार खांदेकरी व इतर सहा लोक उपस्थित होते. गुरुवारी रात्री शंकरनगर परिसरातून एका वृद्ध व्यक्तीचे पाíथव आले असता पुरेसे खांदेकरी मिळाले नाहीत. केवळ तीन माणसे  होती. त्यामुळे घाटावर विसावा न देता थेट सरणाच्या ठिकाणी पार्थिव आणले. येथील कर्मचाऱ्यांनी सरण रचत अंत्यसंस्कार केले. शिडीवर पार्थिव आणले तर चार माणसांची गरज असते मात्र आज ही चार माणसेही मिळणे कठीण झाल्याचे चित्र आहे.

ज्या ठिकाणी अंत्यसंस्काराचे सामान मिळते त्या ठिकाणी कापूर, राळ मिळत नाही. हार व फुलांचा बाजार बंद असल्यामुळे  फुलांचा हार मिळत नाही. केवळ झाडाला लागलेली फुले तोडून ती पार्थिवाला वाहिली जातात. स्मशानात पोहोचल्यावर तिरडीसह मृतदेह चितेवर ठेवताना मृताचे पाय उत्तर दिशेला आणि डोके दक्षिण दिशेला असावे, मृतदेहाच्या पायांचे अंगठे सोडवावे, तिरडीचे सर्व सुंभ आणि बांबू सोडवावेत हे सर्व अंत्यसंस्काराचे विधी असले तरी हे सांगणारे लोक अंत्यसंस्काराच्यावेळी राहत नसल्यामुळे  मरण आता कठीण झाले आहे, असे या कर्मचाऱ्याने सांगितले.

‘व्हच्र्युअल’ अंत्यदर्शन

करोना या आजाराने अनेक सामाजिक चालिरीती अल्पकाळासाठी का होईना कशा बदलून टाकल्या आहेत, याची प्रचिती यवतमाळ जिल्हयातील राळेगाव तालुक्यातील पिंपळगाव (वाढोणा) येथे आली. येथील श्यामराव गुजरकर यांचे वृद्धापकाळाने आज शुक्रवारी निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते. सध्या करोना संसर्ग प्रतिबंधामुळे सर्वत्र बंद असल्याने त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांनाही उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे घरी असलेला त्यांचा मुलगा व कुटुंबीयांनी पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या मदतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. सर्व नातेवाईक  मुंबई, नागपूर, चंद्रपूर येथे असल्याने त्यांना व्हिडीओ कॉलिंगद्वारे  दिवंगत श्यामरावांचे अंत्यदर्शन घडविण्यात आले. या वेगवेगळया शहरातून गुजरकर यांचे नातवाईक त्यांच्या ‘व्हच्र्युअल अंत्यविधीत’ सहभागी झाले होते.