छोट्या विक्रेत्यांचा टाहो

नागपूर : करोना काळात शहरात टाळेबंदीमुळे रस्त्यावरील छोट्या विक्रेत्यांचे व्यवसाय बंद आहेत. हातावर पोट असलेले छोटे विक्रेते सकाळच्यावेळी रस्त्याच्या कडेला किंवा आडोशाला दुचाकी वाहनावर किंवा रस्त्यावर व्यवसाय करत असताना त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. पोलीस किंवा उपद्रवी पथकातील कर्मचारी साहित्य जप्त करत त्यांच्याकडून दंड वसूल करत आहे. यामुळे हातगाडी  किंवा रस्त्याच्या कडेला दुकान लावूनही कमाईपेक्षा दंडाची रक्कम भरत या विक्रेत्यांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. या कारवाईमुळे त्यांची उपासमार होत आहे.

गेल्या दीड महिन्यापासून टाळेबंदीमुळे रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या छोट्या विक्रेत्यांचे व्यवसाय बंद झाले आहेत. अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्यांना सकाळी ७ ते ११ ही वेळ देण्यात आली असून त्याच वेळेत छोटे विक्रेते विविध भागात रस्त्याच्या कडेला किंवा कुठे आडोशाला हातगाडी उभी करत असतात तर काही दुचाकी वाहनावर सामान ठेवून विक्री करत असतात. यातून त्यांचा उदरनिर्वाह चालवण्याला हातभार लागतो. महालातील केळीबाग मार्गावर चपला, सौंदर्यप्रसाधने, कपडे, चपला, गॉगल, फळविक्रेते बसलेले असतात मात्र पोलीस किंवा महापालिकेतील उपद्रवी शोध पथकातील जवान आले की त्यांना माल घेऊन पळावे लागते. सकाळचे दोन तीन तास काही विक्री होते. त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह कसातरी चालतो. मात्र आता या विक्रेत्यांवर कारवाई होत असल्याने आम्ही जगावे कसे, असा प्रश्न आता त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

शहरातील सीताबर्डी, महाल, इतवारी, सक्करदरा, गोकुळपेठ, इतवारी, प्रतापनगर, सदर, मंगळवारी या भागात मोठ्या प्रमाणात छोटे विक्रेते रस्त्याच्या कडेला व्यवसाय करत असतात. पण ३० मे पर्यंत कडक निर्बंध असून सकाळी ११ वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी असतानाही छोट्या विक्रेत्यांना (हॉकर्सना) परवानगी नसल्यामुळे त्यांची आर्थिक  कोंडी झाली आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी आणि कुटुंबाचा गाडा चालवणाऱ्या या गोरगरीब व्यवसायिकांना रोज शंभर ते दोनशे रुपये मिळते. पण आता त्यांना दंड ठोठावला जात आहे.  मिळकत काहीच नसताना दंड भरल्यावर आम्ही जगायचे कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शहरातील मोठी कापडाची दुकाने, किराणा दुकाने शटर पाडून छुप्या पद्धतीने व्यवसाय करत असतात. मात्र छोट्या विक्रेत्यांना कुठले शटर नाही तर कुठली स्थायी जागा नाही. छोट्या विक्रेत्यांसाठी राज्य सरकारने पॅकेज जाहीर केले होते. मात्र अजून काहीच हाती मिळाले नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी उभे राहून व्यवसाय करून पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे. पण पोलीस व महापालिका प्रशासन मात्र चक्क त्यांच्या उदरभरणावर वक्र दृष्टी ठेवून आहेत. त्यामुळे आम्हाला जगू द्या…असा टाहो या लहान विक्रेत्यांनी फोडला आहे.