News Flash

पुन्हा एक हजारावर करोनाग्रस्त आढळले

जिल्ह्य़ात २४ तासांत ८ करोनाबाधितांचा मृत्यू झाला तर १ हजार ७० नवीन रुग्णांची भर पडली.

संग्रहीत

२४ तासांत ८ मृत्यू; १,०७० नवीन रुग्ण

लोकसत्ता खास प्रतिनिधी

नागपूर : जिल्ह्य़ात २४ तासांत ८ करोनाबाधितांचा मृत्यू झाला तर १ हजार ७० नवीन रुग्णांची भर पडली. मध्यंतरी सलग चार दिवस जिल्ह्य़ातील दैनिक  बाधितांची संख्या एक हजाराखाली होती. परंतु दोन दिवसांपासून पुन्हा एक हजारावर बाधित आढळत असल्याने चिंता वाढली आहे.

नवीन रुग्णांमध्ये शहरातील ८४५, ग्रामीण २२३, जिल्ह्य़ाबाहेरील २ अशा एकूण १ हजार ७० रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या १ लाख २२ हजार ७२९, ग्रामीण ३० हजार ३००, जिल्ह्य़ाबाहेरील ९५३ अशी एकूण १ लाख ५२ हजार ८८२ रुग्णांवर पोहोचली आहे.  दिवसभरात शहरात ४, ग्रामीणला २, जिल्ह्य़ाबाहेरील २ असे एकूण ८ रुग्णांचे मृत्यू झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या २ हजार ८१७, ग्रामीण ७७७, जिल्ह्य़ाबाहेरील ७७१ अशी एकूण ४ हजार ३६५ रुग्णांवर पोहोचली आहे.  दिवसभऱ्यात शहरात ५८९, ग्रामीण १३७ असे एकूण ७२६ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या १ लाख १२ हजार ७७१, ग्रामीण २७ हजार ११५ अशी एकूण १ लाख ३९ हजार ८८६ व्यक्तींवर पोहोचली आहे.

करोनामुक्तांचे प्रमाण घसरले

शहरात गुरुवारी दिवसभरात ७ हजार २३२, ग्रामीणला ३ हजार ७४६ अशा एकूण १० हजार ९७८ चाचण्या करण्यात आल्या. बुधवारी ही संख्या ११ हजार ७५० होती. त्यातील गुरुवारी १,०७० करोनाग्रस्तांची भर बघता सकारात्मक अहवालाचे प्रमाण कमी होऊन ९.१० टक्के नोंदवले गेले. जिल्ह्य़ात आजपर्यंत नोंदवलेल्या १ लाख ५२ हजार ८८२ बाधितांच्या तुलनेत १ लाख ३९ हजार ८८६ व्यक्ती करोनामुक्तांची संख्या बघता हे प्रमाण आणखी कमी होऊन केवळ ९०.९० टक्के नोंदवले गेले. अनेक दिवसांनी हे प्रमाण ९१ टक्क्यांच्या खाली गेले आहे.

गृहविलगीकरणात सात हजार रुग्ण

शहरातील आजपर्यंतच्या सक्रिय रुग्णांची संख्या ७ हजार ८८३, ग्रामीण १ हजार ७४८ अशी एकूण ९ हजार ६३१ रुग्णांवर पोहोचली आहे. एकूण रुग्णांतील गंभीर संवर्गातील १ हजार ५१० रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत असले तरी गृह विलगीकरणातील रुग्णसंख्या वाढून ७ हजार ५१ रुग्णांवर पोहोचली आहे.

लसीची दुसरी मात्रा घेतलेल्या परिचारिकेला करोना

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कामठी उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत एका परिचारिकेने १६ फेब्रुवारी रोजी करोना प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा घेतली होती. त्यानंतरही तिला चौदा दिवसांनी करोनाची लागण झाली आहे. लसीची दुसरी मात्रा घेऊन एवढे दिवस लोटल्यावर करोनाची बाधा होण्याची ही जिल्ह्य़ातील आरोग्य विभागाकडील पहिली नोंद आहे.  रश्मी (बदललेले नाव) असे ४२ वर्षीय परिचारिकेचे नाव आहे.  साधारणत: लसीची दुसरी मात्रा घेतल्यावर आठ दिवसांनी करोना विरुद्ध लढण्याचे प्रतिपिंड (अ‍ॅन्टिबॉडी) शरीरात तयार होत असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. परंतु तिला विविध लक्षणे दिसल्यावर १ मार्चलाच चाचणी केली.  अहवालात तिला करोना असल्याचे निदान झाले. कामठी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. नैना दुपारे यांनी ही परिचारिका लसीची दुसरी मात्रा घेतल्यावर १४ दिवसानंतर बाधित आढळली असली तरी त्यात गैर काही नसल्याचे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2021 12:58 am

Web Title: corona virus paient number increased again dd 70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 समाजमत : सांस्कृतिक सभागृह व वसतिगृहासाठी भूखंड हवा
2 मेगाभरतीचा महाघोटाळा : अनेक नियुक्त्यांबाबत प्रश्न
3 पेट्रोल पंपावरील मोदींचे फलक बदलले
Just Now!
X