|| महेश बोकडे

मधुमेहासह अन्य रुग्णांमध्ये जबड्याचे आजार; राज्यभरातील शल्यचिकित्सकांचे निरीक्षण

नागपूर : करोनामुक्त झाल्यावर दाताशी संबंधित समस्या घेऊन रुग्णांची संख्या राज्यभरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयांत  वाढत आहे. मधुमेहासह इतर सहआजार असलेल्या रुग्णांच्या जबडय़ातील हाडात संसर्ग, पस येणे, म्युकोरमायकोसिस असे आजार निदर्शनात येत आहेत. राज्यातील मुख शल्यचिकित्सकांनीही असेच निरीक्षण नोंदवले आहे. विशेष म्हणजे, यातील बहुतांश रुग्णांना  उपचारादरम्यान स्टेरॉईड दिले गेले आहे.

मधुमेह, रोग प्रतिकारशक्ती कमी असलेल्या बाधितांना उपचारादरम्यान स्टेरॉईड दिले जाते. ते आवश्यकही आहे. परंतु यातील काही व्यक्ती करोनामुक्त झाल्याच्या एक ते दोन महिन्यानंतर त्यांना जबडय़ाच्या हाडात संसर्ग, हिरडय़ातून पस जाणे, सगळे दात हलणे, म्युकोरमायकोसिससह इतर काही आजार दिसत आहेत. नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयात करोनापूर्वी प्रत्येक महिन्यात एक ते दोन रुग्ण असे येत होते. परंतु गेल्या पंधरा दिवसांत येथे अशा १२ रुग्णांची नोंद झाली. या रुग्णांचा पूर्वउपचार तपासला असता त्यांना एक ते दोन महिन्यापूर्वी करोना होऊन गेला असून उपचारादरम्यान स्टेरॉईड दिल्याचे पुढे आले. बहुतांश रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाबासह इतर काही गंभीर  आजार होते. या रुग्णांचा संपूर्ण जबडा काढावा लागल्याचे वा त्यावर शस्त्रक्रिया करून उपचार करावा लागल्याचे, नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयातील मुख शल्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अभय दातारकर यांनी सांगितले.

पुण्यातील काही रुग्णालयांतही करोनामुक्त झालेल्या मधुमेह, सहव्याधीच्या रुग्णांमध्ये दातांशी संबधित आजार वाढलेले दिसत आहेत. मी  स्वत: गेल्या दीड ते दोन महिन्यात अशा पद्धतीच्या ४० शस्त्रक्रिया केल्या आहेत. पूर्वी वर्षांला ४ ते ५ शस्त्रक्रियाच कराव्या लागत होत्या. – डॉ. पुष्कर गद्रे, मुख शल्यचिकित्सक, सह्य़ाद्री ग्रुप हॉस्पिटल्स, पुणे.

मुंबईत नुकतेच एका ३७ वर्षांच्या  रुग्णांचे आम्हाला खालचे सर्व दात काढावे लागले. मुंबईतील शासकीय दंत महाविद्यालयात  या पद्धतीच्या जबडय़ाच्या आठ शस्त्रक्रिया केल्या. दोन आणखी होणार आहेत. राज्यभरात असे रुग्ण वाढत आहेत. – डॉ. जयंत लांडगे, राज्य सहसचिव, महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ ओरल अ‍ॅन्ड मॅक्सिलो- फेशियर सर्जन.

रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना करोनाची लागण झाल्यास त्यांनी  मुख आरोग्याकडेही लक्ष द्यावे. करोनामुक्त झाल्यावर  एकदा दंतरोग तज्ज्ञांकडून तपासणी करावी.  दातांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. या रुग्णांबाबत आणखी अभ्यास सुरू आहे. – डॉ. अभय दातारकर,  विभागप्रमुख, मुख शल्यशास्त्र, शासकीय दंत महाविद्यालय, नागपूर