|| देवेश गोंडाणे

सुरक्षा की भूक पर्याय निवडीबाबत पेच; सरकारची मदत तातडीने मिळण्याची अपेक्षा

नागपूर :  राजाने मारले, पावसाने झोडपले तर फिर्याद तरी कुठे करायची असा सवाल उभा राहतो तेव्हा उत्तरच सापडत नाही.. हाच प्रसंग आता हातमजुरांवर उभा ठाकला आहे. आठ दिवसांपासून हाताला काम नसल्याने घरातील अन्नधान्यही संपत आहे. सरकारने पॅकेजची घोषणा केली असली तरी ते कधी आणि कसे मिळेल हे माहिती नाही. त्यामुळे अशीच स्थिती राहिली तर करोना विषाणू आधी भूकच आमच्यासारख्यांचा जीव घेईल, अशी भीती मजूर व्यक्त करीत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर मजुरांच्या हातचे कामही गेले. लॉकडाऊनला सहा दिवस झाले. कुठल्याही बंदीचा सर्वात मोठा फटका हा मजूरवर्गाला बसतो. अगदी तुटपुंज्या मजुरीवर ते काम करीत असल्याने आठवडाभर पुरेल एवढेच अन्नधान्य घरात भरून ठेवतात. मात्र, हाताला कामच नसल्याने त्यांच्यासमोर जगण्याचा प्रश्न उभा आहे. मजुरांच्या या व्यथांचा आढावा घेतला असता सरकारची मदत वेळेत पोहचली नाही तर भूकच आमचा जीव घेईल, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. सुभाषनगर झोपडपट्टी परिसरामध्ये काही मजुरांशी संवाद साधला. रमेश काळे म्हणाले, मी ३०० रुपये मजुरीने मिळेल त्या कामावर जातो. माझी पत्नी काही घरची भांडी घासते. आता आम्ही दोघेही घरीच आहोत. आम्हाला तीन मुली आहेत. शाळा बंद असल्याने त्याही घरीच आहेत. त्यांच्या खाण्याच्या आवडी-निवडी पूर्ण करण्याची आमची ऐपत नाही. पण, आता सगळेच घरी असल्याने रोजचा स्वयंपाक जास्तीचा लागत आहे. घरातील धान्य संपायला आले आहे. सरकार कधी आणि कशी मदत करेल माहिती नाही. त्यामुळे अशीच स्थिती राहिली तर पुढच्या दोन दिवसांनी काय शिजवावे हा प्रश्न निर्माण होणार आहे. अशीच अवस्था शहरातील इतर मजुरांची असून त्यांचा जगण्यासोबतचा सुरू असलेला संघर्ष अवस्थ करणारा आहे.

कुटुंब माझ्या आशेवर

सुभाषनगर येथील महेश गोपाले दुकानात कामाला आहेत. पण दुकान बंद असल्याने गोपाले यांचा पूर्ण परिवार खचून गेला आहे. ते म्हणतात, मला खूप असहाय्य वाटते. मी भाडय़ाच्या घरात राहतो. आठ दिवसांपासून हाताला काम नाही. अशी स्थिती याआधी कधीच पाहिली नाही. घराचे भाडे, अन्नधान्य कुठून आणायचे. गावाकडे असणारे माझे आई-वडीलही माझ्या भरवशावर आहेत. संपूर्ण परिवाराची जबाबदारी असल्याने सरकारची मदत लवकर पोहचणे आवश्यक आहे. अन्यथा सुरक्षा आणि भूक यापैकी कुठला पर्याय निवडावा हा प्रश्न आमच्यासमोर उभा राहणार आहे. महेश गोपाले यांचा हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे.