अनेक व्यवसायांवर बंदी घातल्याने आर्थिक फटका; नवनवीन अफवांमुळे नागपूरकर संभ्रमात; आरोग्याच्या काळजीपोटी घराबाहेर पडणे बंद

नागपूर : करोना आजाराच्या दहशतीमुळे आधीच हादरलेल्या नागपूरकरांना स्थानिक प्रशासनाच्या विविध व्यवसाय बंदीच्या आदेशाने आणखी घाबरवून टाकले आहे. आरोग्याच्या काळजीपोटी अनेकांनी घराबाहेर पडणे बंद केले आहे. परिणामी, शहरात सर्वत्र संचारबंदीसदृश स्थिती दिसत आहे. रोज निर्माण होणाऱ्या नवनवीन अफवांमुळे नागपूरकर संभ्रमात आहेत.

उपाहारगृहांसोबतच पानाची दुकानेही बंद केल्याने लहान दुकानदारांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. लोकांनी घराबाहेर पडणेच थांबवल्याने रिक्षा, ऑटोवाल्यांच्याही अडचणी वाढल्या आहेत. उपाहारगृहे, भोजनालय अचानक बंद करण्यात आल्याने बाहेरून आलेल्या प्रवाशांसह अनेकांना फळांवर दिवस काढावा लागत आहे. करोनाच्या भीतीने आणि व्यवसायाबंदीच्या आदेशाने जणू अवघे शहरच ठप्प पडले आहे.

फूल विक्रेत्यांचा व्यवसाय ठप्प

रामनगर चौकातील हनुमान मंदिराशेजारी फुलांची दुकाने आहेत. करोनाच्या भीतीने लोकांनी मंदिराकडेही पाठ फिरवली आहे. त्यामुळे येथील फूल विक्रेत्यांचा व्यवसाय ठप्प पडला आहे. सार्वजनिक कार्यक्रमही बंद असल्याने बुकेची विक्री बंद असून विकत घेतलेल्या फुलांचे पैसे निघणेही कठीण झाल्याची आपबिती फुलवाल्यांनी सांगितली.

 

गोकुळपेठ सुनेसुने

गोकुळपेठ बाजारात शुकशुकाट पसरला असून रोज भरणारा बाजारही बंद पडला आहे. गुरुवारी सायंकाळी काहीच दुकाने सुरू होती. चिकन, मटणची दुकाने पूर्णपणे बंद होती.

निवासी हॉटेल चालकांचा ७० टक्के व्यावसाय ठप्प

शहरात हजारो छोटे मोठे निवासी हॉटेल्स असून या व्यवसायालाही करोनाचा फटका बसला आहे. शहरात सर्वत्र संचारबंदीसारखे चित्र असल्याने बाहेरून येणाऱ्यांची संख्या घटली आहे. परिणामी, निवासी हॉटेल चालकांचा ७० टक्के व्यवसाय ठप्प झाला आहे. नागपुरात पर्यटन, व्यापार, आरोग्य, मिहान आणि आयटी क्षेत्र मोठे असल्याने दररोज हजारो नागरिक  शहरात येतात. ते आपल्या सोयीनुसार हॉटेलात खोल्यांची नोंदणी करतात आणि दोन-चार दिवस मुक्काम करून निघून जातात. मात्र गेल्या आठवडय़ापासून नागपुरात येणाऱ्यांची संख्या घटली आहे. नागपुरात छोटे मोठे असे ९० निवासी हॉटेल्स तर ५० सव्‍‌र्हिस अपार्टमेंन्ट आहेत. येथे खासगी कार्यक्रम, लग्न समारंभ, परिषदा, वाढदिवस, साखरपुडा असे कार्यक्रम होतात. तर लग्न किंवा मोठय़ा परिषदा असल्याने त्याच हॉटेलच्या खोल्यांची देखील नोंदणी करून ठेवली जाते. मात्र सध्या करोनामुळे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात किंवा पुढे ढकलण्यात आल्याने शहरातील बहुतांश निवासी हॉटेल ओस पडले आहेत. निवासी हॉटेलांवर बंदी नसली तरी करोनामुळे या व्यवसायावरही प्रभाव पडला आहे. शहरातील सर्व छोटय़ा मोठय़ा एकूण निवासी हॉटेलांची दररोजची उलाढाल ही ८० लाखांच्या जवळपास आहे. मात्र गेल्या आठ दिवसांपासून करोनामुळे हाच व्यवसाय अगदी २० लाखांपर्यंत खाली आला आहे. पुढील १० दिवस अजून सर्व निवासी हॉटेल्स बंद राहणार असल्यामुळे एकूणच निवासी हॉटेल व्यवसायिकांना जवळपास आठ ते नऊ कोटींचा फटका बसणार आहे.

बाहेरील विद्यार्थ्यांवर उपासमारीची पाळी

‘करोना’च्या सतर्कतेने आता दहशतीचे रूप घेतले असून उपाहारगृह, खानावळी बंद करण्याच्या निर्णयाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या जगण्याचाच प्रश्न निर्माण झाला आहे. फुटाळा, धरमपेठ, रामनगर या परिसरामध्ये मोठय़ा प्रमाणावर महाविद्यालयीन विद्यार्थी भाडय़ाच्या खोल्यांमध्ये राहतात. आज गुरुवारी या परिसराचा फेरफटका मारला असता विद्यार्थ्यांच्या अडचणी प्रकर्षांने जाणवल्या. विद्यापीठ आणि शासनाने वसतिगृहे बंद केली आहेत. परंतु गावाला जाण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या खोल्यांमध्ये वास्तव्याला आहेत. हे सर्व विद्यार्थी भोजनालयात जेवणारे आहेत.  मात्र,भोजनालयेच बंद झाल्याने या विद्यार्थ्यांनी जेवायला कुठे जावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. फुटाळा भागामध्ये भाडय़ाची खोली करून राहणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी सांगितले की, विद्यापीठाने वसतिगृह रिकामे करून घरी जाण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी अनेक स्पर्धा परीक्षा   एप्रिल महिन्यामध्ये होणार आहेत. त्यामुळे आम्हाला घरी जाणे शक्य नाही.  परंतु, आता भोजनालये बंद केल्याने  आजचा दिवस पोहे खाऊन काढला. स्वत: स्वयंपाक बनवण्याची साधने नाहीत. आर्थिकदृष्टय़ा स्वयंपाकाचा खर्च परवडणारा नाही, अशी खंत या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

सलून, ब्युटी पार्लरही तीन दिवस बंद

शासनाच्या निर्देशानुसार शहरातील विविध सलून आणि ब्युटी पार्लर पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. नाभिक मंडळाची बैठक होऊन त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर शहरात १६०० सलून तर २० ब्युटी पार्लर आहेत. गेल्या आठ दिवसांपासून सलूनमध्ये काम करणारे कर्मचारी मास्क घालून काम करत असतात.  त्यांना करोना विषाणूची लागण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शहरातील  सलून दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवावी, असे आवाहन नाभिक मंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष सुधीर राऊत यांनी केले आहे.

प्रतापनगर, जयताळा, राजीवनगर शांत

पहाटे तीन-साडेतीन वाजेपासूनच गजबजणारे प्रतापनगर चौक म्हणजे वृत्तपत्र विक्र ेत्यांचा ठिय्या. लोक साखरझोपेत असताना येथील कामे सुरू होतात. चहा आणि पोहा विक्र ेत्यांची दुकाने थाटली जातात. आज गुरुवारी मात्र सारे कसे शांत शांत होते. कामे तीच होती, काम करणारेही तेच होते, पण चहा पिणाऱ्यांची गर्दी दिसत नव्हती. याच प्रतापनगर चौकात सकाळी आठ वाजेपासून कामगारांचा ठिय्या असतो. परंतु गुरुवारी मात्र येथेही किर्र् शांतता होती. जयताळा चौक ते राजीवनगर चौक या संपूर्ण मार्गावर सकाळी  ठिकठिकाणी चहानाश्त्यावर ताव मारणाऱ्यांची गर्दी असते. विशेषकरून राजीवनगर चौकातील पोहावाला , जयताळ चौकातील श्रीनाथ हॉटेल म्हणजे प्रियदर्शनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांची नाश्त्याची भूक भागवण्याचे ठिकाण.  पण या मार्गावरील या दोन्ही मुख्य ठिकाणासह हा संपूर्ण रस्ताच गुरुवारी सकाळी ओस पडलेला होता. खामल्याच्या भाजीबाजारावर काही दिवसांपूर्वीच महापालिके ने बुलडोजर चालवले. तरीही हा बाजार पुन्हा वसला आणि भाजीपाल्यासाठी तीच नागरिकांची गर्दी. मात्र, या बाजारातील अनेक दुकाने गुरुवारी बंद होती. जी काही मोजकी दुकाने सुरू होती, त्यातही तुरळक ग्राहक होते. सकाळच्या व्यायामासाठी उद्यान ही ज्येष्ठांची पसंती तर सहकारनगर घाटापासून विमानतळाकडे जाणारा मार्ग ही तरुणाईची पसंती. या मार्गावरील गर्दीही गुरुवारपासून ओसरल्याचे जाणवले.

खामला, देवनगर बाजारात ग्राहकच नाहीत

गुरुवारी सकाळपासून खामला व देवनगर बाजारात शांतता दिसून आली. काही दुकाने सुरू  होती. पण, ग्राहकांचा पत्ता नव्हता. देवनगर चौकात आणि खामला मार्गावर मोठय़ा संख्येने सर्व वस्तूंची बाजरपेठ सजते. येथे हॉटेलची संख्या भरपूर असून पानदुकानेही अनेक आहेत. सकाळी हातठेल्यावर नास्ता करणारेही अनेक असतात. मात्र आज सारेच सामसूम होते. सायंकाळच्या वेळी खामला मार्गावर नेहमी वर्दळ असते. या परिसरात पाच बार आणि एक वाईन शॉप असल्याने रात्री येथे नाश्त्यांचे ठेले लागतात. मात्र त्यावर बंदी असल्यामुळे येथील रस्त्यांवर सायंकाळी शुकशुकाट होता. मुलांच्या शाळेला सुट्टी तसेच उद्याने बंद असल्याने अनेकांनी रस्त्यावर क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.

मनीषनगरात मास्क घालून खरेदी

मनीषनगरात आज वाहनांची वर्दळ तुरळक होती. नेहमीचे किरणा दुकानही बंद होते. नास्ता पाईन्ट आणि सायकल पंचरवाला दिसत नव्हता. अशात एका लहान मुलाने वडिलांना विचारले, बाबा सगळी दुकाने बंद का आहेत? यावर वडील म्हणाले, करोनाची भीती! या भागातील रेस्टारन्ट, आईस्क्रीम पार्लर आणि काही किराणा दुकाने देखील बंद ठेवण्यात आली होती. मात्र,  दुर्गा लेआऊटमधील क्रिष्णा बाजार सुरू होता. तेथील कर्मचारी व ग्राहकही मास्क लावून होते. यातील प्रत्येक जण करोनाविषयी चर्चा करताना दिसत होता. भाजीची दुकाने मात्र सुरू होती. येथेही करोनाची दहशत दिसून येत होती. काल कांदे २५ रुपये किलो रुपये होते. आज ते ४० रुपये किलो करण्यात आले. भेंडी ६० रुपये किलो, चवळीच्या शेंगा ६० रुपये किलो विकल्या जात होत्या. तसेच वेगवेगळ्या भाजी विक्रत्यांकडे वेगवेगळे दर दिसून येते होते. शिवाय ते दोन-तीन दिवसांनी माल येणार नाही. भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होणार आहे. जास्तीची भाजी घेऊन जा, अशी सूचनावजा आग्रह भाजीविक्रेते करताना दिसत होते.

तिरंगा चौक, बडकस चौक, रेशीमबाग थांबले

एरव्ही सकाळच्यावेळी तिरंगा चौक, बडकस चौक, रेशीमबाग, नंदनवन आणि शहीद चौक परिसरात चहा, पानठेले आणि  उपाहारगृहे गजबजलेली असतात. आज गुरुवारी मात्र  सकाळपासून या भागात शांतता होती. दररोज फिरून चौकात येऊन गप्पा मारणारे फिरकले नाहीत तर काहींनी  घरून थर्मासमध्ये चहा आणत चौकात आस्वाद घेतला. या व्यवसायी बंदीचा परिणाम पूर्व, मध्य व दक्षिण नागपुरातील अनेक भागात  दिसून आला.  तिरंगा चौकात एका पानठेला सकाळी सुरू करण्यात आला असता पोलिसांनी तो जप्त केला. या भागात विविध वसतिगृह असून अनेक विद्यार्थी सकाळी चौकात नास्ता व चहा घेण्यासाठी येत असतात. मात्र आज त्यांची पंचाईत झाली. या भागातील उद्याने बंद असल्यामुळे दररोज फिरणारे ज्येष्ठ नागरिक घराबाहेर पडले नाहीत.  मास्क आणि सॅनिटायझरची मागणी वाढल्यामुळे बाजारात टंचाई निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन अनेक दुकानदारांनी मास्क आणि सॅनिटायझर्सची विक्री सुरू केली आहे. एका दुकानदाराने तीनशे रुपयाचा किराणा घेतला तर मूळ किंमतीच्या अध्र्या किंमतीत सॅनिटायझर्स दिले.

गिट्टीखदान, सदरमध्ये अत्यावश्यक वस्तूंची दुकानेच सुरू

पेट्रोल पंप बंद होणार आहेत, दुकानांमध्ये सामान मिळणार नही, अशाप्रकारच्या अफवा एक दिवसापूर्वी पसरवण्यात येत होत्या. पण, सदर व गिट्टीखदान परिसरातील पेट्रोल पंप, अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरू होती. या ठिकाणी सामान्यपणे व्यवहार सुरू होते. गुरुरवारपासून शहरातील पेट्रोल पंप बंद होणार असल्याची अफवा बुधवारच्या रात्री पसरवण्यात आली. त्यामुळे बुधवारी रात्री शहरातील सर्वच पेट्रोल पंपावर वाहनचालकांनी पेट्रोल भरण्यासाठी गर्दी के ली होती. शेवटी जिल्हा व पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले. दुसऱ्या दिवशी प्रसार माध्यमांमधूनही यासंदर्भात जनजागृती करण्यात आली.  लोकांनीही गर्दी न करता नेहमीप्रमाणे खरेदी विक्रीचे व्यवहार के ल्याचे दिसवभर बघावयास मिळाले.

निवासी हॉटेलावर बंदी नाही तरी मात्र आमचा व्यवसाय ७० टक्क्यांनी कमी झाला आहे. आमचे नुकसान होता आहे. परंतु सध्या करोनाचा जो कहर आहे त्याच्यासाठी आम्ही सरकारच्या निर्णयाचे स्वगत करतो. निवासी हॉटेल नियमित सुरू असून रोज  र्निजतुकीकरण करणे सुरू आहे. – तेजिंदर सिंग रेणू, अध्यक्ष, रेसिडेन्सियल हॉटेल असोसिएशन.