जन्माष्टमीला दरवर्षी होणारी लाखोंची उलाढाल यंदा नाही

नागपूर : आणखी एक सण करोनाची भेट ठरला आहे. एरवी चौफेर उत्साहासाठी ज्या जन्माष्टमीला ओळखले जाते त्या जन्माष्टमीलाच बाजारात निरुत्साह  आहे. करोनामुळे यंदा दहीहंडी होणार नसल्याने गोविंदा पथकही हिरमुसले आहेत.

दरवर्षी गोकुळाष्टमीनिमित्त बाजारपेठात मोठा उत्साह बघायला मिळतो. अनेकांच्या घरी विदर्भाच्या भाषेतील कान्होबा बसवण्यात येतो.  शहरातील अनेक भागात दहीहंडी साजरी केली जाते. बाजारपेठा गजबजलेल्या असतात. मात्र यंदा करोनामुळे अवघे चित्रच बदलले आहे.

सध्या शहरातही करोनाचा कहर सुरू आहे. दररोज शेकडो करोनाबाधित आढळत असून मृत्यूची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. अशात सार्वजनिक उत्सव साजरा करण्यावर सरकारने बंदी घातली आहे. गुढीपाडवा आणि अक्षय्य तृतीया टाळेबंदीत निघून गेली. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नुकताच रक्षाबंधनाचा सण झाला. मात्र तोही साधेपणाने साजरा करण्यात आला. त्यामुळे बाजारपेठात जास्त उलाढाल झाली नाही. आता मंगळवारी जन्माष्टमी आहे.

या दिवशी घरोघरी कान्होबा बसवण्यात येते. दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी दहीहंडी आहे. दहीहंडी हा साहसी क्रीडा प्रकार असून यामध्ये सामाजिक अंतर ठेवणे शक्य नाही. त्यामुळे  यंदा दहीहंडीलाही परवानगी नाही.

गोकुळाष्टमी आणि दहीहंडीनिमित्त बाजारात मोठी उलाढाल होत असते. हार-तुरे, सोन्या-चांदीसह धातूंची मोठी खरेदी होत असते. मात्र यंदा करोनामुळे  कुठेही जन्माष्टमीची धामधूम नाही.