२४ तासात मृत्यू नाही

नागपूर : गेल्या २४ तासात जिल्ह्यात एकाही करोना बाधिताच्या मृत्यूची नोंद झाली नाही. दिवसभरात दहा नवे रुग्ण आढळले. नवीन रुग्णांमध्ये  ६ शहरातील तर ४ ग्रामणीचे आहेत. आतापर्यंतची करोना बाधितांची एकूण संख्या ४ लाख ९२ हजार ८५२ वर पोहोचली असून करोनामुळे आतापर्यंत १० हजार ११६ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात २३ रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामध्ये ५ शहरातील तर १८ ग्रामीणचे आहेत. गेल्या २४ तासात ५ हजार ७५७ चाचण्या झाल्या. यामध्ये ४ हजार ५८९ शहरातील तर १ हजार १६८ ग्रामीणच्या आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९१ टक्के आहे.

शालिनीताई मेघे रुग्णालयात कोविशिल्ड उपलब्ध

हिंगणा येथील शालिनीताई मेघे रुग्णालयात कोविशिल्ड लस उपलब्ध झाली आहे. ३० जुलैपासून नागरिकांना सकाळी १० ते दुपारी ४ वाजता दरम्यान लसीकरण करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. नागरिकांना प्रत्येकी ७८० रुपयात ही लस देण्यात येईल. शालिनीताई मेघे रुग्णालय व अनुसंधान केंद्र व दत्ता मेघे मेडिकल महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप गोडे यांनी ज्या नागरिकांनी अजूनपर्यंत लस घेतलेली नाही अशा नागरिकांना करोनापासून स्वत:च्या रक्षणासाठी लवकारत लवकर लसीकरण करुन घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच लस घेतल्यानंतरही नागरिकांनी वारंवार हात धुणे, मुखपट्टी बांधणे व सामाजिक अंतराचे भान राखावे, करोनाच्या नियमांचे पालन करावे, असा सल्लाही डॉ. गोडे यांनी दिला आहे.

विदर्भात १ मृत्यू  

गुरुवारी विदर्भातील वाशीम येथे करोनामुळे एकाचा बळी गेला. नागपुरात १० नवे रुग्ण आढळले. वर्धा  १ बाधित, चंद्रपूर  १४ बाधित, गडचिरोली  ७ बाधित,भंडारा ० बाधित, गोंदिया  १ बाधित, अमरावती  ३ बाधित, यवतमाळ  २ बाधित, वाशीम १ मृत्यू, २ बाधित, अकोला   १ बाधित तर बुलढाणा येथे  ३ बाधितांची नोंद झाली.

आज सर्व केंद्रावर कोविशिल्ड मिळणार

राज्य शासनाकडून कोविशिल्ड लसी मिळाल्याने महापालिकेसह शासकीय केंद्रावर शुक्रवारी सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत  १८ व ४५ वर्षांवरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण होणार आहे. या नि:शुल्क लसीकरणासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल. अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. तसेच ‘ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन’ केंद्रावरही १८ व ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे कोविशिल्डचे लसीकरण सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत होईल.