दोन दिवसांत ३१ मृत्यू; ४७९ नवीन बाधितांची भर

नागपूर :  जिल्ह्य़ात २५ आणि २६ ऑक्टोबर या सलग दोन दिवसांत नवीन करोनाबाधितांच्या तुलनेत करोनामुक्तांची संख्या दुप्पट (९७८) नोंदवली गेली. या ४८ तासांत  ३१ रुग्णांचे मृत्यू झाले असून ४७९ नवीन बाधितांची भर पडली आहे.

शहरात २५ ऑक्टोबरला ६, ग्रामीण ५, जिल्ह्य़ाबाहेरील ७ असे एकूण १८ मृत्यू झाले तर २६ ऑक्टोबरला शहरात ६, ग्रामीणला ३, जिल्ह्य़ाबाहेरील ४ रुग्ण असे एकूण १३ मृत्यू नोंदवले गेले. दोन्ही दिवसांच्या या मृत्यूंमुळे शहरातील  मृत्यूची संख्या २ हजार १२१, ग्रामीण ५५६, जिल्ह्य़ाबाहेरील ४०० अशी एकूण ३ हजार ७७ वर पोहचली आहे. २५ ऑक्टोबरला शहरात १४३, ग्रामीण ७२, जिल्ह्य़ाबाहेरील ७ अशी एकूण २२२ नवीन रुग्णांची भर पडली तर २६ ऑक्टोबरला शहरात २१९ रुग्ण, ग्रामीणला ३४, जिल्ह्य़ाबाहेरील ४ असे एकूण २५७ रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या ७३ हजार ८८, ग्रामीण २० हजार २३३, जिल्ह्य़ाबाहेरील ५८२ अशी एकूण ९३ हजार ९०३ वर पोहचली आहे.  शहरात २५ ऑक्टोबरला ३२०, ग्रामीणला ९२ असे ४१२ व्यक्ती करोनामुक्त झाले. २६ ऑक्टोबरला करोनामुक्तांची संख्या शहरात ३५४, ग्रामीण २१२ अशी एकूण ५६६ होती. त्यामुळे आजपर्यंतच्या शहरातील करोनामुक्तांची संख्या ६७ हजार ४७२, ग्रामीणला १८ हजार २१९ अशी एकूण ८५ हजार ७६३ नोंदवली गेली आहे.

विदर्भातील मृत्यू

(२६ ऑक्टोबर)

जिल्हा                  मृत्यू

नागपूर                   १३

वर्धा                      ०५

चंद्रपूर                   ०२

गडचिरोली             ०३

यवतमाळ               ०२

अमरावती              ०२

अकोला                ०३

बुलढाणा               ००

वाशीम                  ०३

गोंदिया                  ००

भंडारा                   ००

एकूण                   ३३

गृह विलगीकरणातील रुग्णसंख्या साडेतीन हजारांवर

शहरात ३ हजार २२४ आणि ग्रामीण भागात १ हजार ८३९ असे एकूण ५ हजार ६३ सक्रिय करोनाबाधित आहेत. त्यातील १ हजार २५४ बाधितांवर विविध रुग्णालयांत तर ३ हजार ५५२ रुग्ण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत.

दत्ता मेघे महाविद्यालयात करोनापश्चात पुनर्वस केंद्र

वानाडोंगरीतील दत्ता मेघे कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी येथे करोना पश्चात पुनर्वसन बाह्य़रुग्ण विभागाचे उद्घाटन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी शालिनीताई मेघे रुग्णालय व अनुसंधान केंद्राचे कुलगुरु डॉ. दिलीप गोडे, दत्ता मेघे कॉलेज ऑफ फिजिओथेरेपीचे प्राचार्य सचिन चौधरी, वैद्यकीय अधीक्षक डॉ.बी. आर. सिंग उपस्थित होते. करोनातून बाहेर आल्यानंतरही त्रास असलेल्यांवर येथे उपचार होईल.  सोमवार, बुधवार व शुक्रवारी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत येथे रुग्णांची तपासणी, उपचार होणार आहे.