२४ तासांत १३ मृत्यू; ६०२ नवीन बाधित

नागपूर : जिल्ह्य़ात गेल्या पाच दिवसांपासून सातत्याने नवीन करोनाबाधितांची संख्या पाचशेहून कमी नोंदवली जात होती. परंतु आज गुरुवारी २४ तासांत जिल्ह्य़ात नवीन बाधितांची संख्या पुन्हा सहाशे पार गेली. परंतु दिवसभरात नेहमीच्या तुलनेत कमी म्हणजे १३ रुग्णांचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागाला आंशिक दिलासा मिळाला आहे.

गुरुवारी शहरात ४६०, ग्रामीण १३९, जिल्ह्य़ाबाहेरील ३ अशा एकूण ६०२ रुग्णांची भर पडली. त्यामुळे आजपर्यंत शहरातील बाधितांची संख्या ७२ हजार १०४, ग्रामीण १९ हजार ८२८, जिल्ह्य़ाबाहेरील ५५८ अशी एकूण ९२ हजार ५९० वर पोहचली आहे.  दिवसभरात शहरात ६, ग्रामीण ५, जिल्ह्य़ाबाहेरील ३ असे १३ मृत्यू नोंदवले गेले. त्यामुळे आजपर्यंत शहरातील मृत्यूंची संख्या २ हजार ९८, ग्रामीण ५४०, जिल्ह्य़ाबाहेरील ३७६ अशी एकूण ३ हजार १४ वर पोहचली आहे. सध्या शहरात ३ हजार ७५४, ग्रामीणमध्ये २ हजार १९८ असे एकूण ५ हजार ९४३ सक्रिय रुग्ण आहेत. यातील १ हजार ३९६ रुग्णांवर विविध रुग्णालयांत  तर ३  हजार ९४५ रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत.

दिवसभरात ७३७ करोनामुक्त

शहरात दिवसभऱ्यात ५०२, ग्रामीणला २३५ असे एकूण ७३७ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे आजपर्यंत शहरातील करोनामुक्तांची संख्या ७२ हजार १०४, ग्रामीण १७ हजार ६४७ अशी एकूण ८३ हजार ६३३ वर पोहचली आहे. आजपर्यंत आढळलेल्या करोनाबाधितांच्या तुलनेत करोनामुक्तांचे प्रमाण ९०.३३ टक्के आहे.

करोना लसीकरणात आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य

करोना आजारावरील लस उपलब्ध होताच सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाईल. त्यासाठी प्राथमिक नियोजन करण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले आहे. त्यानुसार जिल्ह्य़ातील शासकीय व खासगी आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी तयार करा, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी विविध आरोग्य यंत्रणांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस  मेडिकल, मेयो, इंडियन मेडिकल असो. पदाधिकारी, वेगवेगळ्या हॉस्पिटल असोसिएशनचे पदाधिकारी, जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ऑक्सफोर्डची लस देण्यापूर्वी सॉफ्टवेअरवर नोंदी

ऑक्सफोर्ड विद्यापीठात विकसित कोविशिल्ड लस मेडिकलच्या केंद्रात स्वयंसेवकांना देण्यापूर्वी त्याची नोंद सॉफ्टवेअरवर केली जाणार आहे. हे सॉफ्टवेअर आज सज्ज होणार असून त्यानंतरच स्क्रिनिंगनंतर निवडलेल्या व्यक्तीला ती दिली जाणार आहे. मेडिकलच्या केंद्रात ही लस घेण्यास इच्छुकांची स्क्रिनिंग दोन दिवसांपासून सुरू झाली आहे. त्यानुसार आजपर्यंत सुमारे २० ते २५ व्यक्तींच्या विविध तपासणी करण्यात आली आहे. पैकी बहुतांश व्यक्तींचे करोना, प्रतिपिंड तपासणी, अन्य  तपासणी अहवाल मेडिकलच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे आले आहेत.

विदर्भातील मृत्यू

(२२ ऑक्टोबर) जिल्हा      मृत्यू

नागपूर                           १३

वर्धा                                ०१

चंद्रपूर                            ०२

गडचिरोली                     ०२

यवतमाळ                      ०४

अमरावती                      ०१

अकोला                         ०१

बुलढाणा                         ००

वाशीम                           ०२

गोंदिया                          ०२

भंडारा                             ०१

एकूण                             २९