एकूण करोनामुक्तांची संख्या १,०५४ वर

नागपूर : शहरात बुधवारी रात्रीपासून गुरुवारी रात्रीपर्यंत आणखी नवीन २० करोनाबाधितांची भर पडली. त्यामुळे आजपर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या १,३८५ वर पोहचली आहे. दुसरीकडे शहरात एकाच दिवशी ४२ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयांतून सुट्टी दिली गेली. त्यामुळे आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्याही १,०५४ वर पोहचली आहे.

विदर्भात आजपर्यंतचे सर्वाधिक करोनाबाधित  हे नागपूर आणि अकोला या दोन जिल्ह्य़ांत आढळले आहेत. परंतु अकोल्यात मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक असून  नागपुरात रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण खूपच कमी आहे. नागपुरात गेल्या काही आठवडय़ांपासून अचानक नवीन करोनाबाधित आढळणाऱ्यांची संख्या वाढली, परंतु यशस्वी उपचाराने बरे होणाऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. गुरुवारीही शहरातील मेडिकलमधून २५, मेयोतून १३ आणि एम्समधून ४ असे एकूण ४२ जण करोनामुक्त झाल्याने घरी पोहचले. हे व्यक्ती तांडापेठ, नरसाळा, चंद्रमणीनगर, पाचपावली, हुडकेश्वर, अमरावती, इतवारी, विश्वकर्मानगर, हिंगणा, नाईक तलाव, भोईपुरा परिसरातील आहेत. बुधवारी रात्रीपासून नवीन २० बधितांची भर पडली असून त्यातील २ पारडी, १ मिनी माता नगर, १ अमरावती, ४ पाचपावली, १ नरेंद्रनगरसह इतर ठिकाणचे आहे. यापैकी २ कामठीतील सैन्य रुग्णालय तर ९ जण पाचपावलीतील विलगीकरण केंद्रात होते.

आजारातून बरे होण्याचे प्रमाण ७६.१० टक्के

उपराजधानीत आजपर्यंत आढळलेल्या १,३८५ करोनाबाधित रुग्णांपैकी १,०५४ जण करोनामुक्त झाल्याने घरी परतले आहेत, तर त्यातील २१ जणांचा मृत्यू झाला आहे. दगावलेल्यांतील ८ जण नागपूरबाहेरचे असून त्यांना अत्यवस्थ अवस्थेत  नागपूरच्या मेडिकल, मेयो रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यातच राज्यात आढळलेल्या एकूण रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण ५१ ते ५२ टक्के आहे. परंतु नागपुरात मात्र बरे होणाऱ्याचे प्रमाण तब्बल ७६.१० टक्के असल्याचे समाधानकारक चित्र आहे.