पुन्हा तब्बल ३८ जणांचा मृत्यू; एकूण रुग्ण संख्याही १० हजार पार

नागपूर : शहरात करोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. आज मंगळवारी  एकाच दिवशी ९७७ रुग्णांचा नवा उच्चांक नोंदवला गेला. याशिवाय आणखी तब्बल ३८ जणांचा करोनाने बळी घेतला. शहरात आतापर्यंत एकूण ३७२ करोना बाधितांनी आपला जीव गमावला आहे. शहरातील एकूण रुग्ण संख्याही १० हजार ३६१ वर पोहचली आहे.

मंगळवारी पाच करोनाबाधितांचा मेयोत मृत्यू झाला. यामध्ये मोठा ताजबाग परिसरातील एका ७० वर्षीय पुरुष, कामठी येथील ५३ वर्षीय महिला, पाचपावली येथील ७२ वर्षीय पुरुष, मोमीनपुरा येथील ५९ वर्षीय महिला, मोठा ताजबाग येथील ६२ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. इतर काही जण मेडिकलमध्ये तर काही खासगी रुग्णालयात उपचार घेताना दगावले. आज मृत पावलेल्या ३८ रुग्णांपैकी ९ ग्रामीण तर २६ शहरातील असून ३ रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. दिवसभरात आज ९७७ रुग्ण आढळले असून हा आजवरचा एकाच दिवशी आढळलेल्या करोना रुग्णांचा उच्चांक ठरला आहे. या ९७७ रुग्णांपैकी ३१५ ग्रामीणचे असून ६६२ शहरातील आहेत. यापैकी १४५ रुग्णांचा चाचणी अहवाल मेयोत सकारात्मक आला. १०५ जणांचा अहवाल मेडिकलमध्ये सकारात्मक आला  तर ५७  एम्स, ५८ अ‍ॅन्टीजन चाचणीतून तर ६१२ खासगी प्रयोगशाळेतून सकारात्मक आले आहेत. दिवसभरात २२०० संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या असून यामध्ये ७२३ ग्रामीण तर १,४७७ शहरातील आहेत. सध्या ४,९७४ रुग्ण सकारात्मक असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे. २,२८७ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. दिवसभरात १४६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामध्ये ६३ ग्रामीण तर ८३ शहरातील आहेत. शहरातून आजवर ५, ०१५ रुग्ण बरे झाले असून जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ४८.४० टक्के झाले आहे.

लक्षणे असल्यास तातडीने चाचणी करा – विभागीय आयुक्त

करोना विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी प्रशासनातर्फे प्रभावी उपाय केले जात आहेत. तरीही लक्षणे आढळून आल्यास तात्काळ जवळच्या केंद्रावर जाऊन आपली तपासणी करून घ्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे. आजाराचे निदान झाल्यास मृत्यू टाळणे शक्य आहे. शहरातील २१ केंद्रांवर चाचणी सुविधा उपलब्ध आहे. त्यासोबतच खासगी प्रयोगशाळेतसुद्धा चाचणीची सुविधा उपलब्ध आहे. अँटिजेन चाचणी करून घेतल्यास कुटुंब व निकटवर्तीय यांना त्रास होणार नाही, असे आवाहन डॉ. संजीवकुमार यांनी केले आहे. तपासण्या मोठय़ा प्रमाणात होत असल्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. शहरात ४४ टक्के तर ग्रामीण भागात ६८ टक्केपर्यंत रुग्ण बरे होत आहेत. शहरात कोरोनाबाधितांचा मृत्यूदर ३.४ टक्के तर ग्रामीण भागात १.९८ टक्के एवढा असल्याचे त्यांनी सांगितले.