वरिष्ठांकडून शिपायांचे समुपदेशन

नागपूर : सतरंजीपुरा परिसरातील करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पोलिसांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला असून त्या ठिकाणी सेवा देण्यासाठी पोलीस शिपाई नकार देत असल्याची माहिती आहे.  कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करून व त्यांना धीर देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सतत रस्त्यावर उभे राहावे लागत आहे.

मृत पावलेला रुग्ण सतरंजीपुरातील असून त्याच्या कुटुंबातील लोकांनाही याची लागण झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या ५० वर लोकांना संस्थांत्मक विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे.  जुना मोटरस्टँड ते सुनील हॉटेल आणि मारवाडी टी-पॉईंट चौक ते मुलींच्या वसतिगृहापर्यंतचा परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.  पण, सतरंजीपुरातील रुग्णसंख्या बघून पोलीस कर्मचाऱ्यांमध्येही भीती पसरली आहे. या परिसरात बंदोबस्त लावल्यानंतर अनेक कर्मचारी वरिष्ठांकडे तेथे काम न करण्याची इच्छा व्यक्त करीत असून अनेक कर्मचारी बंदोबस्त करण्यास नकार देत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. पोलीस विभागासाठीही ही आव्हानात्मक परिस्थिती असून कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. त्यांचा धीर वाढवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच रस्त्यावर उतरून कर्मचाऱ्यांसोबत बंदोबस्त करावा लागत असल्याची प्रतिक्रिया लकडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांनी  दिली.

बैरागीपुरा परिसर सील

गांधीबाग महाल झोनअंतर्गत येणाऱ्या बैरागीपुरा प्रभाग क्रमांक २२ येथे करोनाबाधित रुग्ण आढळल्याने हा संपूर्ण परिसर सील करण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले. यानुसार गांधीबाग महाल झोन क्रमांक ६ आणि सतरंजीपुरा झोन क्रमांक ७ अंतर्गत असलेल्या प्रभाग क्रमांक २१ व २२च्या उत्तर -पूर्वेस ए.एम.ए. कंपनी मालधक्का रोड, दक्षिण-पूर्वेस उमिया शंकर शाळा, दक्षिण-पश्चिमेस मासुरकर चौक, उत्तर-पश्चिमेला होटल मदिना, पूर्वेस बोधीसत्व बौद्ध विहार, प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या भागातील सर्व मार्ग तात्काळ बंद करून येथील सीमा पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आल्या आहे.  अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचारी, वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, खाजगी डॉक्टर, परिचारिका, औषध दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका यांना या आदेशातून वगळले आहे.