दीड रुपयांचा मास्क चक्क दहा रुपयांत

नागपूर : संकट काळातही काळाबाजारी करून लुटण्याची प्रवृत्ती नागपूरकरांना अस्वस्थ करीत आहे. वस्तूंचा तुटवडा असल्याचे सांगून काही किराणा दुकानदार जास्त दरात विक्री करीत असल्याचा प्रकार सुरू असतानाच आता मास्कविक्रीतही काळाबाजारी सुरू झाली आहे. शहरात मास्क लावणे अनिवार्य झाल्याने दीड रुपयांचा मास्क चक्क दहा रुपयात विकला जात आहे.

बहुतांश दुकानांमध्ये मास्कचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा फायदा घेत काही औषध विक्रेत्यांनी उपलब्ध असलेल्या मास्कचे दर चारपट वाढवले आहेत. साधे मास्क करोना येण्यापूर्वी दीड रुपयांत मिळत होते. मात्र आता तेच मास्क दहा रुपयांत विकले जात आहेत. त्याशिवाय विविध प्रकारचे मास्क बाजारात येत असून त्यामध्ये सर्जिकल मास्क, एन ९५, कापडी मास्क असे अनेक प्रकार आहेत. मात्र त्याचाही तुटवडा निर्माण झाला आहे. औषध बाजारातील ठोक विक्रेत्यांकडेच मास्क नसल्याने  त्याचा काळाबाजार सुरू झाला आहे. एन ९५ या मास्कचे दोन तीन प्रकार आहेत. मात्र हे मास्क दोन ते चार दिवसात फेकावे लागते. त्याचीही मोठी मागणी असून ते देखील बाजारात उपलब्ध नाहीत. इतर स्वस्तात मिळणारे मास्क केवळ चार तासात निरुपयोगी ठरतात. त्यामुळे दररोज हजारोच्या संख्येने मास्कची मागणी वाढत आहे.

 

अधिक दराने मास्क विकणाऱ्यांवर छापा

शासनाच्या दरनिश्चितीनंतरही अधिक दराने मास्कची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी छापे टाकले. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त नीलेश भरणे, उपायुक्त गजानन राजमाने, सहाय्यक पोलिस आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी देवनगर चौकातील श्रीकृष्ण सुपर बाजार येथे छापा टाकला. येथे सॅनिटायझर अधिक दराने विकले जात असल्याचे निदर्शनास आले. याचप्रमाणे गुन्हेशाखा पोलिसांनी सावरकरनगर चौकातील  मान मेडिकल स्टोअर्समध्ये धाड टाकली. या स्टोअर्समधून

१६ रुपये किमतीचे मास्क ४५ रुपयांना विकल्याचे समोर आले. सिव्हिल लाईन्समधील ब्रेड एन बियोंड बेकरी येथेही छापा टाकला. शिवाजीनगर येथील दुर्गा मेडिकल स्टोअर्स व शर्मा मेडिकल स्टोअर्समध्ये छापे टाकले. या दोन्ही औषध विक्रीच्या दुकानांमध्ये मास्क २५  रुपयांमध्ये विकण्यात येत होते. अधिक दराने मास्कची विक्री करणाऱ्या दुकानदारांची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी,असे आवाहन गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांनी केले आहे.

लोकसंख्येच्या तुलनेत केवळ दहा टक्के मास्क

नागपूरची लोकसंख्या जवळपास ३० लाखांच्या घरात आहे. मात्र त्या तुलनेत दहा टक्के देखील मास्क बाजारात नाहीत. अशा विचित्र स्थितीत मास्क लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय महापालिका आयुक्तांनी संकेतस्थळावर मास्क बघून तसे घरी तयार करण्याच्या उपयोजना सुचवल्या आहेत. मात्र किती लोकांना संकेस्थळ हाताळता येते, मोठाच  प्रश्न आहे.

पुढील दोन दिवसांत मुबलक साठा

सध्या मास्कचा सर्वत्र तुटवडा आहे. मागणीच्या तुलनेत ते अपुरे पडत आहेत. अहमदाबाद येथून आणि काही स्थानिक ठिकाणांवरुन मास्क येत आहेत. पुढील दोन दिवसात मुबलक मास्क उपलब्ध होतील. दोनपदरी मास्क ८  तर तीनपदरी मास्क १६ रुपयांमध्ये मिळेल. संघटनेने दर निश्चित केले आहेत.

– राजेंद्र कावडकर, अध्यक्ष, नागपूर डिस्ट्रीक्ट केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन.