दोन दिवसांत तब्बल १०३ रुग्णांची नोंद

नागपूर : उपराजधानीत दोन दिवसांमध्ये १०३ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे शहरातील एकूण करोनाग्रस्तांच्या संख्येने अडीचशेचा पल्ला ओलांडला असून एकूण रुग्ण २६५ झाले आहेत. हे रुग्ण मेडिकल, मेयोत हलवले जात असल्याने दोन्ही रुग्णालयांमध्येही दाखल  रुग्णांच्या संख्येचाही नवीन उच्चांक नोंदवला जाण्याची शक्यता आहे.

उपराजधानीत ५ मे २०२० रोजी एकूण बाधितांची संख्या १६२ होती. या दिवशी २४ तासात केवळ १ नवीन बाधित आढळल्याने आरोग्य विभागाला आंशिक दिलासा मिळाला होता. परंतु ६ मे आणि ७ मे या दोन दिवसांमध्ये शहरात तब्बल १०० नवीन रुग्ण वाढले.

आढळलेल्या एकूण रुग्णांमध्ये सर्वाधिक ८५ रुग्ण हे केवळ मोमीनपुरा परिसरातील आहेत. त्यानंतर सतरंजीपुरा १४, गणेशपेठ १, मोठा ताजबाग १, जरीपटक्यातील कुशीनगर १, पार्वतीनगर १चा समावेश आहे. पार्वतीनगर सोडून इतर सर्व रुग्णांना महापालिकेच्या आरोग्य विभागाने आधीच विलगीकरणात घतले होते. या सगळ्यांचा अहवाल सकारात्मक आल्याचे कळताच महापालिकेकडून तातडीने सगळ्यांच्या संपर्कातील इतरही जास्तीत जास्त व्यक्तींची माहिती मिळवत त्यांनाही विलगीकरणात आणले.

मृताचा मामा रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संपर्कात

पार्वतीनगरमधील ज्या करोनाबाधित युवकाचा मृत्यू झाला, तो युवक अजनी रेल्वे कॉलनीत त्याच्या नातेवाईकाच्या संपर्कात होता. याकडे रेल्वे कामगार सेनेने लक्ष वेधत संपर्कात आलेल्या सर्वाची तातडीने करोना चाचणी करण्याची मागणी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे केली. रेल्वे कामगार सेनेचे विभागीय सचिव प्रमोद गोंडजर यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेशकुमार यांना पत्र लिहिले आहे. पार्वतीनगर अजनी रेल्वे कॉलनीला खेटून आहे. मृत युवक रेल्वेतील एका कर्मचाऱ्याचा भाचा आहे. ते ट्रॉलीमन म्हणून काम करतात. आता ते गृह विलगीकरणात आहेत, असे  समजते. गोधनी ते कळमेश्वर सेक्शनध्ये २५ मार्चपासून काम सुरू आहे. या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात मृत युवकाचा मामा आल्याचे कळते. मृत युवक मामाकडे नियमित ये-जा करत होता.

५६ दिवसांत १५० जण बाधित

नागपूरमध्ये ११ मार्च २०२० रोजी करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर ३४ दिवस कमी-अधिक रुग्णांची नोंद होत १४ एप्रिलला पन्नासाव्या रुग्णाची नोंद झाली. त्यानंतरचे पन्नास रुग्ण केवळ १० दिवसांत म्हणजे २५ एप्रिलला नोंदवले गेले. त्यानंतरचे पन्नास रुग्ण केवळ ७ दिवसांत आढळले असून ५ मे रोजी शहरातील रुग्णसंख्येने  बाधितांची संख्या दीडशेवर पोहचली आहे. त्यानंतरचे शंभर रुग्ण केवळ दोन दिवसांत आढळले.

‘सारी’च्या तीन रुग्णांना करोना

मेडिकल येथे उपचार घेणाऱ्या ‘सारी’च्या तीन रुग्णांनाही करोना असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. हे तिन्ही रुग्ण सारीच्या वर्डात उपचार घेत असले तरी ते नवीन ठिकाणचे असल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. या रुग्णांच्या नातेवाईकांकडून प्रशासनाने त्यांच्या प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांची माहिती घेणे सुरू केले असून त्यांनाही खबरदारी म्हणून विलगीकरणात घेतले जाणार आहे.

मालेगावच्या मदतीला नागपूरचे ‘एम्स’

राज्यातील ‘मालेगाव’मध्येही करोनाग्रस्तांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. तेथे नमुने तपासणीला मर्यादा असल्याने तेथून ११६ नमुने तपासणीसाठी नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स)मध्ये पाठवण्यात आले आहे. एम्सच्या संचालक डॉ. विभा दत्ता, करोना विषयाचे येथील समन्वयक डॉ. मनीष श्रीगिरीवार आणि प्रयोगशाळेच्या प्रमुख डॉ. मीना मिश्रा (वाजपेयी) यांनीही दुपारी आलेले हे नमुने तातडीने सायंकाळपासून येथील प्रयोगशाळेत तपासले.

मजुरांना परत पाठविण्यासाठी  पोलिसांचे उत्तम सहकार्य

आतापर्यंत सुमारे आठ हजारांवर मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे पन्नासपेक्षा अधिक बसगाडय़ा मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्ये पाठवण्यात आल्या. दूरअंतरावर राहणाऱ्यांना रेल्वेद्वारे पाठवले जात आहे. शहराबाहेरली सर्वच नाक्यांवर मोठय़ा प्रमाणात मजुरांची गर्दी झाली असून त्यांची तपासणी केल्यावर त्यांना बस किंवा रेल्वेद्वारे पाठवण्याची व्यवस्था केली जाईल, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त नीलेश भरणे यांनी सांगितले.

मृत युवकाच्या आजाराचे मोमीनपुरा ‘कनेक्शन’

पार्वतीनगरातील करोनाबाधित मृत  हा तंबाखू गल्लीत नेहमी मित्रांसमवेत राहत होता आणि त्याचे संबंध मोमीनपुराशी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याच्या पाच मित्रांचे विलगीकरण करण्यात आले आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर मृताचे मोमीनपुरा ‘कनेक्शन’ आहे की नाही हे स्पष्ट होईल. हे युवक मास्क विकत होते. गुरुवारी परिसरातील जवळपास ८० लोकांचे विलगीकरण करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.