मेडिकलमध्येही केवळ २७८ लसी उपलब्ध

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : जिल्ह्य़ात  करोनाचे गंभीर रुग्ण वाढत असतानाही अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) रेमडिसिव्हर आणि इतरही काही महागडय़ा औषधांचा तुटवडा आहे.  येथे रुग्णांना रेमडिसिव्हर बाहेरून आणायला लावले जात असून मेडिकलमध्येही केवळ २७८ रेमडिसिव्हर शिल्लक आहेत. या गंभीर बाबीकडे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे.

राज्य शासनाच्या अखत्यारित असलेल्या मेडिकल, मेयोत जोखमेतील रुग्णांना रेमडिसिव्हर औषध नि:शुल्क मिळत आहे. परंतु केंद्राच्या अखत्यारित असलेल्या एम्समध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना हे औषध बाहेरून आणायला लावले जात आहे. येथे साठा संपल्यावर तो जिल्हा प्रशासनाने पुन्हा उपलब्ध न केल्याने रुग्णांवर भरुदड बसत आहे. एम्सकडून मध्यंतरी जिल्हा शल्यचिकित्सकांना ‘रेमडिसिव्हर’ची मागणी केली गेली होती. त्यांनी काही प्रमाणात हे औषध दिले.  परंतु  रुग्ण जास्त असल्याने ते काही दिवसातच संपले, त्यानंतर मात्र वारंवार मागणी केल्यावरही  ‘रेमडिसिव्हर’ मिळालेले नाही. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कामावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहे.  दरम्यान,  एम्समध्ये सर्व खाटा फुल्ल असून बरेच रुग्ण आल्या पावली परत जात आहेत.

या विषयावर एम्सच्या संचालिका डॉ. विभा दत्ता आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

एम्समध्ये मध्यंतरी रेमडिसिव्हर संपल्यावर प्रशासनाने उसनवारीवर काही प्रमाणात पुरवठा केला. आता ते संपले असल्यास पुन्हा उपलब्ध करण्याचे प्रयत्न केले जातील. हाफकीनकडून लवकरच रेमडिसिव्हरचा पुरवठा होणार असून त्यानंतर ही समस्याच सुटेल.

– डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा शल्यचिकित्सक व करोनाचे नोडल अधिकारी.