एकूण बाधितांची संख्या पाच हजारांवर

नागपूर : मेडिकल, मेयोसह इतर रुग्णालयांत २४ तासांत सात करोनाबाधितांचा मृत्यू झाला तर येथील शहर  व ग्रामीण भागात दिवसभरात तब्बल ३४२ नवीन बाधितांची भर पडली. नवीन बाधितांमुळे येथील आजपर्यंतच्या बाधितांच्या संख्येने पाच हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

मेयो रुग्णालयात मृत्यूची नोंद झालेल्या तिघांपैकी एक ५० वर्षीय पुरुष  गणेश टेकडी रोड, रेल्वे पुलिया परिसरातील आहेत. त्याला ११ जुलैला  दाखल करण्यात आले होते. २९ जुलैच्या रात्री त्याचा मृत्यू झाला. दुसरा रुग्ण नया बाझार, मोठी मशीद, कामठीतील ३५ वर्षीय पुरुष आहे. त्याचा २९ जुलैला रात्री मृत्यू झाला. त्याचा अतिमद्यपानाचा इतिहास  होता. तिसऱ्या न्यू येरखेडा येथील ६५ वर्षीय पुरुषाला २६ जुलैला दाखल करण्यात आले होते. त्यांचा ३० जुलैला मृत्यू झाला.  इतर रुग्णालयांमध्ये ४ मृत्यू नोंदवले गेले. या सर्व मृत्यूंमुळे  मेडिकल, मेयोसह इतर रुग्णालयांतील एकूण मृत्यूंची संख्या ११८ वर पोहचली आहे. ग्रामीण भागात प्रथमच २४ तासांत १६० नवीन बाधितांचा उच्चांक नोंदवला गेला. शहरात १८२ नवीन बाधित आढळले.

सक्रिय रुग्णांची संख्या १,७२२

जिल्ह्य़ातील सक्रिय रुग्णांची संख्या १,७२२ वर पोहचली आहे.  यापैकी ३४१ रुग्ण मेयो रुग्णालयात, ३१८ रुग्ण मेडिकलला, ३६ रुग्ण एम्स, ११ रुग्ण कामठी, ४२ रुग्ण खासगी रुग्णालय, ११ रुग्ण आमदार निवासातील कोविड केअर सेंटर (सीसीसी), ११ रुग्ण मध्यवर्ती कारागृहातील सीसीसी, ३१ रुग्ण व्हीएनआयटी सीसीसी, ३४ रुग्ण वारेगाव येथील सीसीसी, १४ रुग्ण वनामतीतील सीसीसी, १४ रुग्ण पाचपावलीतील सीसीसी, २४ रुग्ण रवी भवन येथील सीसीसीमध्ये उपचार घेत होते. तर ८२४ जण उपचाराच्या प्रतीक्षेत होते.

महापालिका हद्दीत मृत्यूचे शतक

नागपूर महापालिका हद्दीत गुरुवारी करोना बळींचे शतक नोंदवले गेले. ग्रामीणमध्ये १८ तर येथील रुग्णालयांत जिल्ह्य़ाच्या बाहेरील २९ मृत्यूंची नोंद झाली आहे. एकूण मृत्यूसंख्या ११८ वर पोहचली आहे.

मेयोत ३८ बाधित गर्भवतींची प्रसूती

उपराजधानीतील मेयो रुग्णालयात आजपर्यंत ३८ करोनाबाधित गर्भवतींची प्रसूती करण्यात आली. पैकी बुधवारी बैतुलच्या महिलेची व्हेंटिलेटरवर प्रसूतीनंतर निधन झाले होते. परंतु इतर बहुतांश मातांसह बाळांची प्रकृती ठणठणीत आहे, तर मेडिकलमध्येही दहाहून अधिक बाधितांची प्रसूती झाल्याची माहिती आहे.

दिवसभरात २२५ करोनामुक्त

शहरात गुरुवारी दिवसभरात १२७ तर ग्रामीण भागात ९८ असे जिल्ह्य़ात एकूण २२५ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालय अथवा कोविड केअर सेंटरमधून सुट्टी दिली गेली. त्यामुळे आजपर्यंत जिल्ह्य़ातील करोनामुक्तांची संख्या थेट ३,२९४ झाली आहे. पैकी १,८२० जण शहरातील तर १,४७४ जण ग्रामीणमधील आहेत.