कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे प्रतिपादन

युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देताना अनेकदा त्यात यश मिळत नसल्यामुळे त्यांच्यामध्ये नैराश्य निर्माण होते. त्यामुळे अशा युवकांसाठी महापालिकेने कौन्सिलिंग सेंटरची निर्मिती करावी आणि प्रोत्साहन द्यावे, असे मत कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केले.

युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यासोबतच वेगवेगळ्या अभ्यासक्रमाची माहिती देण्याच्या उद्देशाने महापालिका, फॉरच्युन फाऊंडेशन आणि इंजिनियरिग कॉलेज प्लेसमेंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘युथ इम्प्रुव्हमेंट समिट’चे उद्घाटन कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रकल्पाचे प्रमुख आमदार अनिल सोले, आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, स्थायी समिती अघ्यक्ष संदीप जाधव, कौशल्य विभागाचे सचिव सुनील भारद्वाज आदी मान्यवर उपस्थित होते.

काही वर्षांंपूर्वी वाढती लोकसंख्या हे देशासमोर मोठे आव्हान असताना आता मात्र केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर ही वाढीव लोकसंख्या देशाची ताकद निर्माण झाली आहे. देशात उद्यमशीलता वाढावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध प्रकल्प राबवित असताना कौशल्य विकासाच्या माध्यमातून युवकांना प्रशिक्षित केले जात असताना त्यातून रोजगार निर्मितीचे साधन उपलब्ध करुन दिले जात आहे. विदर्भ आणि मराठवाडा मोठा अनुशेष असताना नागपूरसह विदर्भात आणि मराठवाडय़ात उद्योग येऊ लागले आहेत. कौशल्य विकास केंद्र निर्माण होत असताना त्यात विविध व्यवसायाच्या दृष्टीने अभ्यासक्रम राबविले जात आहे. ज्या क्षेत्रात संधी मिळाली त्या संधीला कमी न लेखता त्याचे सोने कसे करता येईल या दृष्टीने युवकांनी प्रयत्न केले पाहिजे. २०२२ पर्यंत रोजगारांची अनेक दारे उघडली जाणार असून त्यादृष्टीने युवकांनी कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्रशिक्षण घ्यावे आणि स्वत:चे करियर घडवावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, जीवनात काही तरी करायचे ही जिद्द ठेवून प्रत्येकाने रोजगाराच्या दृष्टीने प्रयत्न करावे. कौशल्य विकासामधून विविध विषयाचे प्रशिक्षण देण्यासाठी संस्थांची निर्मिती होत असताना युवकांना आता ही संधी आहे. येणाऱ्या काळात रोजगाराची साधने मोठय़ा प्रमाणात वाढणार.  शासनाच्या अनेक योजनाचा युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अनिल सोले यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले.

कुठलेही काम न लाजता निष्ठेने करेल तोच जीवनात यशस्वी होतो. कोणतेही काम हे कनिष्ठ किंवा श्रेष्ठ नसते. ज्यातून  उपजीविका साध्य होते, तेच काम श्रेष्ठ असल्यामुळे युवकांनी तशी मानसिकता ठेवून काम करावे, असे आवाहन डीएसके ग्रुपचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डी.एस कुळकर्णी यांनी केले.
पहिल्या सत्रात डी. एस. कुळकर्णी यांनी ‘उद्योजकेतून युवकांचा विकास’ या विषयावर विद्यार्थ्यांना मागदर्शन केले. यावेळी कुळकर्णी यांनी लहान लहान उदाहरणे देत त्यांनी कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे शालेय जीवनापासून केलेला संघर्ष आणि त्यात मिळालेल्या यशातील विविध पैलू उलगडले. वयाच्या आठव्या वर्षी वृत्तपत्र वाटण्याचे काम करीत होते. त्यानंतर घरे रंगविण्याचे, टेलिफोन दुरुस्तीचे काम केले. यामुळे त्यांना ग्राहकांच्या स्वभावाची ओळख झाली. पुढे या अनुभवाचा फायदा झाला. ज्याप्रमाणे मूर्तीकार स्वत: शिल्प घडवतो त्याप्रमाणे प्रत्येकाने स्वतचे जीवन मनाप्रमाणे घडवावे मात्र कोणतीही नोकरी किंवा व्यवसाय करताना ग्राहकाचे हीत डोळ्यासमोर ठेवावे असा सल्ला त्यांनी दिली. कष्टाला प्रतिष्ठा असते त्यामुळे कष्टाला लाजू नका असे सांगून केंद्र सरकार आणि राज्य सरकार तरुणाईसाठी रोजगार आणि कौशल्य विकासाच्या भरपूर योजना राबवित आहे, त्या सर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आज यशस्वी युवकांचा सत्कार होणार

उद्या, रविवारी सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यशस्वी युवकांचा सत्कार होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री विद्यार्थ्यांंशी संवाद साधणार आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले उपस्थित राहणार आहे. दुपारी २ वाजता ‘अ‍ॅडॉप्टिबिल्टी मंत्रा फॉर सक्सेस’ या विषयावर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना होईल.