प्रजासत्ताक दिनी वाहतूक विस्कळीत, कर्णकर्कश डीजेमुळे नागरिक त्रस्त
प्रजासत्ताक दिनी भारताची राज्यघटना अस्तित्वात आल्याने या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, अलीकडच्या काळात प्रजासत्ताक दिनाच्या नावाखाली रस्त्यावर युवकांचा धांगडिधगा जास्त वाढत असताना मंगळवारी उपराजधानीत भाजपचे नेते आणि मुख्यमंत्र्यांचा उजवा हात समजले जाणारे नगरसेवक मुन्ना यादव यांच्या दोन चिरंजिवांनी ‘बेटी बचाव – पेढी पढाव’ या गोंडस नावाखाली काढण्यात आलेल्या मिरवणुकीत रस्त्यावर डीजेच्या तालावर नाचत आणि हातात तिरंगा ध्वज फडकवत शहरात अक्षरश: धुडगूस घातला.
परवानगी न घेता काढण्यात आलेल्या भाजयुमोच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या सातशेपेक्षा अधिक बेधुंद तरुणाईमुळे सामान्य माणूस त्रस्त झाला होता. शहरातील वाहतूकही त्यामुळे विस्कळीत झाली होती.
गणराज्य दिनी शहरातील विविध भागात पोलिसांचा बंदोबस्त असताना सकाळपासून शहरातील विविध भागात काही उत्साही युवक हातात तिरंगा ध्वज घेऊन कर्कश आवाजात ओरडून आणि गाडीचे हॉर्न वाजवित सुसाट वेगाने रस्त्यावरून फिरत असल्याचे दिसून आले. मुन्ना यादव यांचे दोन चिरंजीव अर्जुन उर्फ चिंटू यादव आणि त्याचा थोरला भाऊ करण यादव या दोघांनी देशभक्तीच्या नावावर विनापरवानागी ७०० मुलांची बाईक रॅली काढत शहरातील विविध भागात फिरवली.
अनेक ठिकाणी रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाला ते वेगळेच. रस्त्यावर डीजेच्या कर्णकर्कश आवाजात सुरू असलेल्या गाण्यांवर नाचत हिडीस प्रदर्शन केले जात होते. मात्र या दोन नेता पुत्रांना त्यांच्या या चाळ्यांपासून रोखण्याची हिम्मत बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी दाखवली नाही.
नागपुरात वर्धा रोड, देवनगर, ऑरेंज सिटी रुग्णालय, खामला, प्रतापनगर, माटे चौक अशा अनेक भागांमध्ये हा नेता पुत्रांचा देशभक्तीचा धुडगूस रस्त्यावर बघायला मिळाला.
भाजयुमोच्या सातशेपेक्षा अधिक मुलांना बरोबर घेऊन विना परवानगी बाइक रॅली काढल्याने वाहतुकीचे तर केव्हाच तीन तेरा वाजले होते. ‘बेटी बचाव बेटी पढाव’ हा उद्देश ठेवून ही मिरवणूक काढण्यात आली. मात्र, मिरवणुकीत त्या संदर्भात बॅनर किंवा फलक कुठेही दिसून आले नाही किंवा त्या विषयावर कोणत्याही घोषणाही दिल्या गेल्या नाही.
अनेक गाडय़ाच्या बॉनेट आणि टपावर बसणे, हाताता तिरंगा घेऊन देशभक्तीच्या नावावर लोकांना शिव्या देणे, मनात येईल त्याप्रमाणे स्वतच्या दुचाकी रस्त्यांवर उभ्या करणे, मनसोक्त नाचणे असे सर्व प्रकार सुरू असताना या सत्ता पुत्रांना थांबविणारे मात्र कोणीच दिसत नव्हते.
काही दिवसांपूर्वी चिंटू यादवने एका युवकाला मारहाण केली होती आणि त्याबाबत धंतोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल झाला होता. त्यावेळी पोलिसांवर दबाव आणून ते प्रकरण दडपण्यात आले होते, हे विशेष.
या मिरवणुकीतील चित्राचीच शहरातील विविध भागात पुनरावृत्ती झाल्याचे दिसून येत होते. फुटाळा आणि अंबाझरी तलाव परिसरात युवकांची गर्दी दिसून येत असल्यामुळे या भागात पोलिसांचा बंदोबस्त होता, त्यामुळे काही प्रमाणात युवकांवर पोलिसांचा वचक असल्याचे दिसून आले तरी काही उत्साही युवक मात्र पोलिसांना न जुमानता सुसाट वेगाने गाडय़ा चालवत असताना दिसून आले.

या संदर्भात भाजयुमोचे शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांच्याशी संवाद साधला असताना त्यांनी सांगितले, गणराज्य दिनाच्या दिवशी काढण्यात आलेल्या दुचाकी मिरवणुकीशी भाजयुमोचा काही संबंध नाही. यादव बंधूनी ती मिरवणूक काढली आहे. देशभक्तीच्या नावावर अशा पद्धतीने मिरवणुकीच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन केले जात असेल तर चुकीचे आहे. शिस्तीने आणि नियमात बसून मिरवणूक काढली पाहिजे मात्र यादव बंधूनी त्याचे उल्लंघन केले असेल तर ते नक्कीच चुकीचे असल्याचे कुकडे म्हणाले.