शासकीय कार्यालयात होत असलेला भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नसल्याचे सांगत, भ्रष्टाचाराची प्रकरणे जनतेने माझ्याकडे घेऊन यावीत, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. नागपूर सुधार प्रन्यासमध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आली आहेत. ‘नासुप्र’च्या अधिकाऱ्यांना गडकरींनी वाडय़ावर बोलावून त्यांची झाडाझडती घेतली. भ्रष्टाचार संपवून नागरिकांची कामे तात्काळ करण्याची ताकीदही त्यांनी दिली.
गडकरी यांनी शनिवारी त्यांच्या निवासस्थानी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विकास कामांचा आढावा घेतला. गेल्या अनेक दिवसात वेस्टर्न कोलफिल्ड प्रशासनाकडे असलेले प्रलंबित प्रश्न सुटले जात नव्हते. पैसे घेऊन खोटी कामे केली जात होती. त्यामुळे भ्रष्टाचार होत असल्यामुळे कामे होत नव्हती. मात्र, आता यापुढे असे होणार नाही. भूसंपादनाच्या संदर्भात असलेली अनेक प्रकरणे ही केवळ अधिकारी आणि राजकीय कारणाने प्रलंबित ठेवली जात होती. विविध शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन प्रलंबित प्रकरणांचा निपटारा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
वेस्टर्न कोलफिल्डने ४० वषार्ंत केले नाही ते काम राज्यात भाजप सरकार आल्यानंतर २१ महिन्यांत केले आहे. शासकीय कार्यालयातील कामात पारदर्शकता कशी आणता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे. जनतेने शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणली तर त्यांनी ती माझ्याकडे द्यावी, भ्रष्टाचार करणाऱ्यांची कुठलीही गय केली जाणार नसल्याचे गडकरी म्हणाले.

काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
उमरेडमधील काँग्रेसच्या नगरसेविका विजयालक्ष्मी रणधीरसिंह भदोरिया यांच्यासह शंभरावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शनिवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी गडकरी यांनी त्यांचे स्वागत केले.