पोलीस दलातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची संख्या इतर विभागांच्या तुलनेत खूप आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकणाऱ्यांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या इतर विभागाच्या तुलनेत अधिक दिसते. कर्मचाऱ्यांच्या प्रमाणात सापळ्यांचा विचार केल्यास ते प्रमाण कमी असून भ्रष्टाचार हा कोणत्याही यंत्रणेचाच भाग आहे. त्यामुळे संपूर्णपणे भ्रष्टाचार रोखणे कठीण आहे, असे धक्कादायक वक्तव्य राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी केले.

पोलीस महासंचालक तीन दिवसांच्या नागपूर-विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते विदर्भातील गुन्हेगारी व कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेत आहेत. या निमित्ताने पोलीस जिमखाना परिसरात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केले. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आकस्मिक मृत्यू दाखल करण्यात आला असून त्याची चौकशी पुणे पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणात तपासावर काही परिणाम होतील का, असे मला काहीही सांगता येणार नाही किंवा तपासाच्या बाबी उघड करता येणार नाही. तपास अधिकारी आवश्यक ती माहिती प्रसारमाध्यमांना देऊ शकतात. पण, तपास पूर्ण झाल्यानंतर योग्य ती माहिती दिली जाईल, असेही नगराळे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएद्वारा करण्यात येत असून महाराष्ट्र पोलिसांचा त्यात हस्तक्षेप नाही. नगर दादरा हवेलीच्या खासदाराच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस योग्य दिशेने करीत आहेत. गडचिरोली जिल्ह्य़ातील नक्षलवाद या विषयावर मात्र पोलीस महासंचालकांनी बोलणे टाळले.