पहिल्यांदाच दोन राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे यजमानपद मिळालेली नागपूर जिल्हा बास्केटबॉल संघटना (एनडीबीए) आणि महापलिका या स्पर्धेच्या आयोजनाला घेऊन चांगलीच अडचणीत आली आहे. स्पर्धेच्या एका पत्रकार परिषदेवर एक लाखाचा खर्च झाल्याचे समोर येताच हा पूर्ण खर्च एनडीबीएने केल्याचा दावा महापालिकेचे क्रीडा सभापती प्रमोद चिखले यांनी केला. मात्र, महापालिकेच्या अंदाज पत्रकात हा खर्च महापालिकेच्या नावे दाखवला आहे. त्यामुळे खर्चा संदर्भातला गोंधळ कायम आहे.

क्रीडा सभापती प्रमोद चिखले यांनी पत्रकार परिषदेचा खर्च एनडीबीएने केल्याचे स्पष्ट केले असून त्यांनी हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये स्पर्धेच्या एका पत्रकार परिषदेचे ७१ हजार ९८० रुपयांचे बिल सादर केले. तसेच  हा खर्च चार पत्रकार परिषदांचा होता. मात्र, महापालिका अधिकाऱ्यांच्या चुकामुळे तसे नमूद करण्याचे राहून गेले, असे स्पष्टीकरण देण्यात आले.

महापौरांच्या कक्षासमोर बास्केटबॉलचा खेळ

बास्केटबॉल महापौर चषक क्रीडा स्पर्धेवर ४२ लाख रुपये खर्च करण्यापेक्षा स्पर्धा रद्द करून राज्यातील पूरग्रस्तांना मदत करा, अशी मागणी करत युवक काँग्रेसचे अध्यक्ष बंटी शेळके यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी महापौरांच्या कक्षासमोर बास्केटबॉल खेळून अभिनव आंदोलन केले.  यावेळी  त्यांनी आवर्जून बुधवारी लोकसत्तामध्ये प्रकाशित झालेल्या बातमीचा दाखला देत जाब विचारला. तसेच प्रशासनाच्या विरोधात घोषणा देऊन या स्पर्धेचा निषेध केला. महापौरांना निवेदन देत त्यांच्याशी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चर्चा केली.

हॉटेल सेंटर पाईंटमध्ये बॉस्केटबॉल स्पर्धेसंदर्भात झालेली पत्रकार परिषद महापालिकेने नव्हे तर एनडीबीएने घेतली. त्याचा पूर्ण खर्चही एनडीबीएने केला आहे. महापालिकेने चार पत्रकार परिषदांसाठी एक लाखाच्या निधीची केवळ तरतूद केली आहे. भविष्यात या स्पर्धेसाठी पत्रकापरिषद झाली, तर त्यावर तो खर्च टप्प्याटप्प्यात करण्यात येईल.

– संदीप जोशी, सत्तापक्ष नेता, महापालिका.