23 November 2020

News Flash

कॉटन मार्केट परिसरातील रस्ते खड्डय़ात

पंधरा वर्षांचे वाहनाचे आयुष्य असताना केवळ ७ ते ८ वर्षांतच वाहन खिळखिळे होते.

कॉटन मार्केट चौकातील रस्त्यांवरील खड्डे.

कॉटन मार्केट-मोक्षधाम-बैद्यनाथ चौक;  दरवर्षी नुसती निकृष्ट डांबराने डागडुजी

सध्या शहरातील सर्वच रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर खड्डे की खड्डय़ात रस्ते असा प्रश्न निर्माण व्हावा, अशी अवस्था त्यांची झाली आहे. कॉटन मार्केट चौक ते मोक्षधाम आणि मोक्षधाम ते बैद्यनाथ चौक रस्तेही त्याला अपवाद नाहीत. एकूणच परिस्थिती ही महापालिकेच्या रस्ते बांधणीच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असून दरवर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेकडून निकृष्ट दर्जाचे डांबर व मातीने खड्डय़ांची डागडूजी केली जात आहे.

११ वर्षांपासून नागपूर महापालिकेत सलग भाजपची सत्ता आहे. ‘इतरांपेक्षा वेगळे’ अशी शेखी मिरवणाऱ्या या पक्षाच्या सत्ताकाळातही रस्त्यांची अवस्था सुधारली तर नाही, उलट त्यांची दूरवस्था झाली आहे. बैद्यनाथ चौक ते मोक्षधाम आणि मोक्षधाम चौक ते कॉटन मार्केट हे रस्ते नेहमीच उखडलेले असतात. घाट रोडवर बैद्यनाथ चौकापर्यंत सिमेंटचा रस्ता झाला. मात्र, त्यापुढचे बांधकाम झाले नाही. वाहनचालक, पादचाऱ्यांना मोठय़ा खड्डय़ांना चुकवत किंवा त्यातूनच वाट काढत पुढे जावे लागते. यामुळे अनेकदा अपघातही झाले आहेत. वाहतूक पोलिसांनी महापालिकेशी पत्रव्यवहार करून खड्डे बुजविण्याची विनंती केली. मात्र, प्रशासनाने केवळ डागडूजीवर भर दिला. आता खड्डय़ांमध्ये माती टाकली जात आहे. ज्या ठिकाणी डांबर टाकले जात आहे ते इतके निकृष्ट दर्जाचे आहे की, पावसाच्या एक सरीने गिट्टी वेगळी होते. खड्डय़ातून होणाऱ्या दैनंदिन प्रवासामुळे लोकांना कंबरदुखी, मानदुखीचा त्रास सहन करावा लागत आहेत. पंधरा वर्षांचे वाहनाचे आयुष्य असताना केवळ ७ ते ८ वर्षांतच वाहन खिळखिळे होते. शेवटी महापालिकेतील सत्ता पक्षांचा हा उन्माद किती दिवस सहन करायचा, असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत.

खड्डे बुजविण्याचे काम सुरू

परिसरात सिमेंट रस्ते मंजूर झाले असून त्यांचे काम करण्यात येणार आहे. तत्पूर्वी सध्या रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरू असून अपघात होऊ नये म्हणून मुरुम टाकला जात आहे. त्यानंतर डांबर व गिट्टीने खड्डे बुजवले जातात.

– गणेश राठोड, सहाय्यक आयुक्त, धंतोली झोन.

लोकांच्या मृत्यूची वाट बघताय काय?

रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे वाहन चालविणे अडचणीचे झाले आहे. खड्डा चुकविण्यासाठी लोक वाहने इकडे तिकडे वळवितात. यातून अनेक अपघात होत असून एखादा मोठा अपघात होऊन लोकांचा जीव गेल्याशिवाय महापालिका प्रशासनाला जाग येणार नाही का? रस्त्यांची डागडूजी करण्यापेक्षा चांगले रस्ते बांधावे.

– नीलेश काळे, रा. गणेशपेठ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 23, 2017 3:55 am

Web Title: cotton market area roads amid the potholes
Next Stories
1 भ्रष्ट नेते, खोटी आश्वासने अन् ‘ब्ल्यू व्हेल’ विरोधी बडगे
2 विदर्भात यंदा नद्या दुथडी भरून वाहिल्याच नाहीत!
3 कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना झाला नाही
Just Now!
X