बाजारपेठेत एखाद्या वस्तूंचे दर वाढण्यासाठी आवश्यक सर्व बाबी अनुकूल असल्या तरी गतवर्षीचा शिल्लक साठा मोठय़ा प्रमाणात असल्याने यंदा कापूस बाजारपेठेला याचा फटका बसणार आहे. चीनसह इतरही देशांनी आयात बंद केल्याने तसेच बाजारात सूतापेक्षा कापूस महाग असल्याने याचाही मार बाजारपेठेला सहन करावा लागणार आहे.
उत्पादनात घट, मागणीत वाढ या दोन बाबी बाजारपेठेत वस्तूंच्या दरवाढीसाठी पुरेशा ठरतात. कापसाचा विचार केला तर यंदा या दोन्ही बाबी कापसासाठी अनुकूल आहेत. कापसाचे लागवड क्षेत्र घटल्याने उत्पादनातही घट येण्याची शक्यता आहे, दुसरीकडे कापसाच्या उत्पादनाचा वापरही वाढल्याने त्याची मागणीही वाढण्याची शक्यता आहे. असे असले तरी प्रत्यक्षात कापसाच्या देशांतर्गत आणि जागतिक पातळीवरच्या बाजारपेठेचे चित्र फारसे दिलासा देणारे नाही.
कापूस उत्पादक पणन महासंघाचे अध्यक्ष एन.पी. हिराणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिकस्तरावर २२ दशलक्ष टन कापूस गाठी शिल्लक आहेत. उत्पादन कमी आणि मागणी वाढली तरी २१.३९ दशलक्ष टन साठा शिल्लक राहण्याची शक्यता आहे. भारतात गत वर्षीच्या ७८ लाख गाठी शिल्लक राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे जागतिकस्तरावर वापर वाढ झाल्याने कापसाची मागणी २ टक्क्याने वाढून ती २४.७ दशलक्ष टनापर्यंत जाण्याची शक्यता आहे. मागील पाच वर्षांत प्रथमच एकूण उत्पादनाच्या तुलनेत कापसाचा वापर एक लाख दशलक्ष टनाने वाढला आहे. भारताचा विचार केला तर ही वाढ ३१५ लाख गाठींपर्यत (४ टक्के) जाण्याची शक्यता आहे.
चीन हा सर्वात मोठा कापूस आयात करणारा देश असून त्याने खरेदी थांबविली आहे. कारण चीनमध्येच कापूस शिल्लक आहे. दोन वषार्ंपूर्वी चीन ने मोठय़ा प्रमाणात कापूस उत्पादक देशातून कापसाची आयात केली होती. त्यामुळे बाजारात तेजी आली होती. तशी परिस्थिती यंदा नाही. भारतातील सूत गिरण्याची स्थिती अत्यंत वाईट आहे. कापूस खरेदी करून त्यापासून सूत काढण्याचा व्यवसाय आता तोटय़ाचा ठरला आहे. बाजारपेठेत कापसापेक्षा सूत स्वस्त अशी स्थिती आहे, असे हिराणी म्हणाले.
महाराष्ट्रात सीसीआयचा एजन्ट म्हणून कापूस उत्पादक पणन महासंघाने कापूस खरेदी सुरू केली असून ३९०० ते ४१०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे भाव आहे. यापेक्षा जास्त भाव व्यापाऱ्यांनाही देणे कठीण असल्याने सध्या तरी मोजकेच व्यापारी बाजारात आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त कापूस महासंेघाकडे येण्याची शक्यता असून तो खरेदी करण्याची तयारी हिराणी यांनी दर्शविली आहे.