राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन; रक्षा व अंतरिक्ष कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन

नागपूर : विद्यापीठाला निधी कमी पडू देणार नाही. यासाठी गरज पडल्यास देश-विदेशातून निधी उभारला जाऊ शकतो. मात्र, देश संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होणे हे अतिशय गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी केले. त्यादृष्टीनेच वेगवेगळ्या अभ्यासक्रमाची सुरुवात केली जात असल्याबद्दल राज्यपालांनी समाधान व्यक्त केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये रक्षा व आंतरिक्ष तंत्रज्ञानावर आधारित प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. विद्यापीठाच्या या अभिनव रक्षा व आंतरिक्ष कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कधीकाळी आध्यात्मिक कौशल्याचे प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशियाई देशांमध्ये सुरक्षाविषयक शस्त्रनिर्मिती व आधुनिक तंत्रज्ञानाची स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेत आपले अस्तित्व टिकवण्यासाठी विद्यापीठांनीही संरक्षण क्षेत्रातील सुरक्षाविषयक अभ्यासक्रमाला सुरुवात करणे गरजेचे आहे. नागपूर विद्यापीठाने या संदर्भात पाऊल टाकल्याचा मला आनंद असल्याचे राज्यपाल म्हणाले. आशियाई देशांमध्ये इतरांचे अस्तित्व नष्ट करून केवळ आपलेच अस्तित्व जगमान्य व्हावे इथपर्यंत कडवी संरक्षणविषयक स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे रक्षा, आंतरिक कौशल्य या विषयांमध्ये मोठय़ा प्रमाणात मनुष्यबळ निर्मितीची आवश्यकता आहे. व्यासपीठावर महापौर दयाशंकर तिवारी, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, ग्रुप कॅप्टन ग्रुप कमांडर एनसीसी एम. कलीम, अधिष्ठाता डॉ. संजय कविश्वर, डॉ. प्रशांत माहेश्वरी, डॉ. दत्तात्रय वाटमोडे उपस्थित होते. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी प्रास्ताविक केले. महापौर दयाशंकर तिवारी यांनीही संबोधित केले.

विद्यापीठात संरक्षण तज्ज्ञ घडावेत

नागपूर विद्यापीठातील या अभ्यासक्रमाने मनुष्यबळ निर्मितीला वाव मिळणार आहे. जागतिक दर्जाच्या अनेक कंपन्या या परिसरात पुढील काळात संरक्षणविषयक निर्मिती क्षेत्रात येणार आहेत. त्यामुळे विद्यापीठाने या अभ्यासक्रमाकडे विशेष लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली. कौशल्ययुक्त मनुष्यबळासोबतच संरक्षण तज्ज्ञही विद्यापीठात घडावे, अभियंते, तंत्रज्ञ, अभ्यासकही निर्माण व्हावे, प्रधानमंत्र्यांनी देखील हीच अपेक्षा व्यक्त केली असल्याचे राज्यपाल म्हणाले.