योगी आदित्यनाथ यांचे प्रतिपादन; ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

उत्तर प्रदेश हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रदेश होता. मात्र, पूर्वीच्या सरकारने ऊस उत्पादकांची अतिशय वाईट परिस्थिती केली. त्यामुळे साखर कारखाने डबघाईला आले. भाजपचे सरकार आल्यावर ऊस उत्पादकांना ४० कोटी रुपयांची मदत केली. बंद झालेले साखर कारखाने आज पुन्हा सुरू झाले आहेत. या कारखान्यातून इथेनॉलची निर्मिती केली जाणार असून शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. अन्नदाता सुखी असेल तर देश सुखी होईल, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.

‘अ‍ॅग्रोव्हिजन’ या मध्य भारतातील सर्वात मोठय़ा कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री आणि अ‍ॅग्रोव्हिजनचे प्रवर्तक नितीन गडकरी, केंद्रीय कृषी मंत्री  राधामोहन सिंह, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, बिहारचे कृषिमंत्री प्रेमकुमार, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,  महापौर नंदा जिचकार, सी.डी. मायी, रवींद्र बोरटकर आदी उपस्थित होते.

योगी आदित्यनाथ म्हणाले, अ‍ॅग्रोव्हिजनच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन आणण्याचे काम केले जात आहे. गावातच शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून जलसंवर्धनासाठी महाराष्ट्राने केलेले कार्य अद्भुत आहे. ग्रीन इंधनापासून खूप मोठी बचत शक्य असून हा निधी शेती विकासावर खर्च केला जाऊ  शकतो. अ‍ॅग्रोव्हिजनच्या विशेष प्रयत्नामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना नवे व्हिजन प्राप्त झाले आहे. अ‍ॅग्रोव्हिजन शेतकऱ्यांना नवी प्रेरणा देणारे ठरेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पावसाची तूट व अपुऱ्या सिंचन सोयीमुळे शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनावर विपरीत परिणाम होत होता. मात्र, राज्यात जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर लोकसहभागातून कामे करण्यात आली. त्यामुळे भूगर्भातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. यावर्षी ७२ टक्के पाऊस होऊन सुद्धा विकेंद्रित पाणीसाठय़ामुळे अनेक ठिकाणी कृषी उत्पादनात वाढ झाली आहे. अ‍ॅग्रोव्हिजन प्रदर्शनामुळे नव्या तंत्रज्ञानाचा परिचय शेतकऱ्यांना होत असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात अ‍ॅग्रोव्हीजन मैलाचा दगड ठरेल. कृषी क्षेत्रात महाराष्ट्राने भरीव कार्य केले असून शेतकऱ्यांना २१ हजार कोटींची कर्जमाफी दिली आहे. कृषी संबंधित २७ हजार कोटींचे अनुदान दिले. या चार वर्षांत ४८ हजार कोटीची मदत विविध मार्गाने शासनाने शेतकऱ्याना केली आहे. दीड लाख शेततळे व दीड लाख सिंचन विहिरी निर्माण करुन कृषी सिंचनाची शाश्वत व्यवस्था शासनाने उभी केली आहे. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून १६ हजार गावात ५ लाख कामे केली आहेत. यावर्षी ७२ टक्के पाऊस होऊन सुद्धा जलयुक्त शिवाराच्या कामामध्ये अनेक जिल्ह्य़ात कृषी उत्पादन वाढले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले तर आभार रमेश मानकर यांनी मानले.  रवींद्र बोरटकर यांनी प्रास्ताविक केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भगवे वस्त्र परिधान करतात. त्यामुळे या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना बाबूंपासून तयार करण्यात आलेले भगवे वस्त्र भेट दिले.

स्वप्न दाखवून दिशाभूल करणार नाही – गडकरी

मुंबईत भांडे घासायच्या मातीला जो भाव आहे त्यापेक्षा कमी भाव शेतकऱ्यांच्या विदर्भातील धानाला आहे, अशी खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर ज्या घोषणा केल्या ते कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करणार. आमचे सरकार केवळ स्वप्न दाखवून लोकांची दिशाभूल करणार नाही. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, कारण विदर्भात सिंचनाची सोय नव्हती. विहिरीला पंपासाठी वीज मिळत नव्हती. आता शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात असून त्यांना आधुनिक शेती करण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण दिले जात आहे.  अ‍ॅग्रोव्हिजनमध्ये केवळ विदर्भातीलच नाही देशभरातील शेतकरी येऊन शेतीच्या विकासासंबंधी माहिती घेत आहेत. ज्या दिवशी विदर्भातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही त्यावेळी आमचे मिशन पूर्ण होईल, असेही गडकरी म्हणाले.