News Flash

बाळ दत्तक घेतलेल्या दाम्पत्याकडेच ताबा

इशरत व शोएब यांनीही मुलाचा ताबा मिळण्यासंदर्भात दावा केला.

|| मंगेश राऊत

सहा वर्षांनंतर मूल परत मागणाऱ्या आई-वडिलांना नागपूर खंडपीठाकडून नकार

नागपूर : अनैतिक संबंधातून जन्माला आलेले बाळ बदनामीच्या भीतीने एका दाम्पत्याला दत्तक देण्यात आले. आता सहा वर्षांनी बाळाचे मूळ आईवडील एकत्र आले व त्यांनी बाळावर आपला हक्क सांगितला. हे प्रकरण न्यायालयात गेले. पण, वर्तमान स्थितीत बाळाच्या भावना, त्याचे भविष्य आणि पुराव्यांचा विचार करून मुलाचा ताबा दत्तक घेतलेल्या आईवडिलांकडेच असायला हवा, असा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला.

यशोधरानगर परिसरातील रहिवासी इशरत व शोएब (नावे बदललेली) यांच्यात प्रेमसंबंध होते. यातून इशरतला गर्भधारणा झाली. पण, शोएबने आपल्या आईवडिलांच्या दबावात दुसऱ्या महिलेशी विवाह केला. गर्भधारणेवेळी इशरत आपल्या आईवडिलांकडे होती. गर्भ सहा महिन्यांचा झाल्यावर तिने घरी ही माहिती दिली. पण, गर्भपाताची मुदत निघून गेली होती. शेवटी ३० ऑगस्ट २०१४ ला इशरतने मेयो रुग्णालयात बाळाला जन्म दिला. बाळाच्या जन्मावेळी दस्तावेजावर इशरत आणि शोएब यांचे नाव लिहिले होते. जन्मताच मुलाला कावीळ झाले. त्याची प्रकृती चिंताजनक होती. बाळाचा जन्म झाल्यावर इशरत व तिच्या वडिलांनी समाजात बदनामीच्या भीतीने व बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याने ते बाळ परिचयातील डॉ. मिनाज व कलीम (नाव बदललेली) यांना दिले. डॉ. मिनाज व कलीम यांनी बाळाचा खासगी रुग्णालयात उपचार केला. त्याच्यावर औषधोपचारासाठी लाखो रुपये खर्च केले. त्याचा जीव वाचला. आज तेच बाळ सहा वर्षांचे आहे. हे बाळ स्वीकारताना डॉ. मिनाज व कलीम यांनी २७ ऑक्टोबर २०१४ चे एक दस्तऐवज लिहून घेतले होते. त्यावर दोन साक्षीदारांची स्वाक्षरी असून सर्वांचे छायाचित्रही आहे. आता इशरत आणि शोएब  पुन्हा एकत्र आले. शोएबला पहिल्या पत्नीपासून एक मुलगी व मुलगा आहे. त्याने इशरतसोबतही विवाह केला असून तिला एक मुलगी आहे. आता त्यांना त्यांचे बाळ परत हवे आहे. त्यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी डॉ. मिनाज व शोएब यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याविरुद्ध डॉ. मिनाज व शोएब यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली.  इशरत व शोएब यांनीही मुलाचा ताबा मिळण्यासंदर्भात दावा केला. या याचिकेवर न्या. अतुल चांदुरकर आणि न्या. नितीन सूर्यवंशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली.  न्यायालयाने बाळाच्या भावना, दोन्ही कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती आणि पुरावे बघता बाळाचे भविष्य डॉ. मिनाज व कलीम यांच्यासोबतच सुरक्षित असल्याचे मत नोंदवले.

निकालाचे कारण…

शोएब  ऑटोरिक्षा चालवतो व त्यांच्या दोन्ही पत्नींकडे स्वतंत्र उत्पन्नाचे साधन नाहीत. त्यांच्याकडे स्वत:चे पक्के घरही नाही. शिवाय त्यांना तीन मुले आहेत. बाळ जन्माला आले त्यावेळी दोघांचाही विवाह झालेला नव्हता. अनैतिक संबंधातून बाळ जन्माला आल्यानंतर बदनामीच्या  भीतीने त्यांनी बाळ दत्तक दिले. या उलट डॉ. मिनाज व कलीम यांनी दत्तक घेतलेले हे एकच बाळ असून त्या स्वत: डॉक्टर व पती व्यवसाय करीत असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. जन्मावेळी बाळाला कावीळ होते व त्याची परिस्थिती चिंताजनक असतानाही त्यांनी बाळावर लाखो रुपये खर्च करून त्याचे प्राण वाचवले. या परिस्थितीत बाळाचे भविष्य विद्यमान पाल्यांसोबतच उज्ज्वल असल्याचे मत नोंदवून उच्च न्यायालयाने इशरत व शोएबचा दावा फेटाळला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2021 3:03 am

Web Title: couple born of an immoral relationship were adopted by a couple for fear of being slandered akp 94
Next Stories
1 राज्यातील ‘त्या’ उपकेंद्र सहायकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा
2 मुख्यमंत्र्यांच्या सचिवासह वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिलासा
3 वाघांचे आनुवंशिक वैविध्य संपण्याची भीती
Just Now!
X