News Flash

‘डीबीओ’ येथे विमान उतरवण्याचे धाडस आज उपयोगी

नागपूरकर एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर (निवृत्त) यांचा पहिला प्रयत्न

नागपूरकर एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर (निवृत्त) यांचा पहिला प्रयत्न

राजेश्वर ठाकरे, लोकसत्ता

नागपूर : चीनसारख्या वर्चस्ववादी देशाच्या सीमारेषाचा बहुतांश भाग जेथून नजरेस पडतो, अशा जगातील सर्वोच्च ठिकाणी  भारतीय सैन्याला हवी तेव्हा रसद पुरवता यावी म्हणून नागपूरकर एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर (निवृत्त )यांनी दौलत बेग ओल्डी येथे विमान उतरण्याचे २००८ साली दाखवलेले धाडस आज भारतीय लष्कराला उपयोगी पडत आहे. चीनने वास्तविक नियंत्रण रेषेवर सैन्याचा जमाव वाढवताच भारताने विमानाने तेथे सैन्य उतरवून चीनला प्रतिउत्तर दिले आहे.

चीनपासून अतिशय जवळ लद्दाख येथे दौलत बेग ओल्डी आहे. समुद्र सपाटीपासून १६ हजार ७०० फूट उंचीवर असलेली   जगातील सर्वात उंच धावपट्टी येथे आहे. ही धावपट्टी कच्ची असून चहुबाजूने डोंगरांनी वेढलेली आहे. प्राणवायूचे प्रमाण ४० ते ४५ टक्के कमी असल्याने येथे विमान उतरवल्यावर ते बंद करता येत नाही. विमान बंद पडले की पुन्हा सुरू होणे शक्य नसते. नैसर्गिक अडचणी आणि चीनशी वाद नको म्हणून भारत दौलत बेग ओल्डी येथे हवाई हालचाली करण्याचे टाळत होता. देशाला या धावपट्टीची भविष्यात गरज पडेल म्हणून तत्कालीन ग्रुप कॅप्टन सूर्यकांत चाफेकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना येथे ट्रायल घेण्याची विनंती केली व ३१ मे २००८ ला या धावपट्टीवर विमान (एएन-३२) उतरवले. तब्बल ४३ वर्षांनी दौलत बेग ओल्डी येथे विमान उतरले. व्यावसायिक धैर्य दाखवल्याबद्दल चाफेकर यांना शौर्य चक्र प्रदान करण्यात आले. त्यानंतर त्यांनी तेथे १०० हून अधिकवेळा विमान उतरवले आणि हवाई दलासाठी ही धावपट्टी नियमित सरावासाठी उपलब्ध झाली. आज त्याच धावपट्टीचा वापर भारत-चीन सीमेवर भारतीय लष्कराला जलद गतीने म्हणजे केवळ २० मिनिटात पोहोचवण्यासाठी होत आहे. लेह येथे धावपट्टी आहे. तेथे सैन्याला आणून सीमेवर पोहण्यासाठी १५ ते २० दिवस लागतात. पण, एका सैन्य अधिकाऱ्याच्या धाडसाने देशाला सीमा सुरक्षेचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.

उणे १० ते उणे ५० अंश सेल्सिअस तापमान

दौलत बेग ओल्डी अर्थात डीबीओ हे भारत-चीन सीमेपासून अगदी जवळ असलेले एअरबेस आहे. येथून ईशान्येला चीन २ किलोमीटर, वाव्ययेला १५ किलोमीटर आहे. त्यामुळे येथे भारतीय सैन्याला जे काही करायचे ते पश्चिमेला करावे लागते. येथे उणे १० ते उणे ५० अंश सेल्सिअस तापमान आहे. त्यामुळे पक्की धावपट्टी करणे शक्य होत नाही.

‘‘सैन्य उतरवण्यासाठी आता दौलत बेग ओल्डीचा वापर केला जात आहे. मी या ठिकाणी विमान उतरवण्याचे ट्रायल घेतले आणि ४५ वर्षांनंतर येथे ऑपरेशनला सुरुवात झाली. माझे योगदान आता महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचा मला अभिमान आहे.’’

– सूर्यकांत चाफेकर, एअर व्हाईस मार्शल (निवृत्त) 

भारतीय लष्कर गालवान नाल्यावर पूल उभारत आहे. त्यावर चीनने आक्षेप घेत भारतीय ठाण्यापासून १० ते १५ किलोमीटरवर गेल्या आठवडय़ात जवानांची संख्या वाढवली आहे. त्याला प्रतिउत्तर देत भारतीय लष्कराने देखील सैन्य तैनात केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2020 1:37 am

Web Title: courage to land aircraft at dbo is useful today zws 70
Next Stories
1 टाळेबंदीच्या काळात कुशल मनुष्यबळाची माहिती एका क्लिकवर
2 विलगीकरणातील नागरिकांना रात्री उशिरापर्यंत बाहेर ठेवले
3 सायबर सेलच्या ‘डिफॉल्टर’ची माया जमवण्यासाठी धडपड
Just Now!
X