आरोपीचे कुटुंबीय सून म्हणून स्वीकारण्यास तयार * भेटीचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश

नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तो सध्या मध्यवर्ती कारागृहात आहे. आता आरोपीचे कुटुंबीय पीडितेला सून म्हणून स्वीकारण्यास तयार असून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायालयाने पीडित मुलीला इतर नातेवाईक व वकिलांसह आरोपीला कारागृहात भेटण्याची परवानगी दिली व असून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

राहुल दुरुगकर असे आरोपीचे नाव आहे. तो सावनेर येथील रहिवासी आहे. २०१४ मध्ये आरोपी व पीडितेची भेट झाली होती. आरोपीने तिच्याशी मैत्री केली, तिला लग्नाचे आमिष दाखवले व तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, तिला गर्भधारणा झाली. ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आले. गर्भपात करण्याचे प्रयत्नही करण्यात आले. तिने त्याला लग्नाची विनंती केली. एका मंदिरात दोघांनी विवाह केला. तो तिला घेऊन आपल्या घरी गेला, पण आरोपीच्या आईवडिलांनी तिला सून म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. तिला शिवीगाळ करून घरातून हाकलून लावले. त्यानंतर दोघेही पीडितेच्या घरी गेले. त्या घरी तो दोन दिवस राहिला. दोन दिवसांनी तो स्वत:च्या घरी गेला व नंतर परतलाच नाही. त्यामुळे तिने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला व आरोपीला अटक केली. दुसरीकडे पीडितेने एका मुलाला जन्म दिला. याप्रकरणी सत्र न्यायालयात सुनावणी झाली व न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याप्रकरणी आता आरोपीच्या कुटुंबीयांनी पीडितेला सून म्हणून स्वीकारण्याची तयारी दर्शवली असून उच्च न्यायालयात सर्व संमतीने याचिका दाखल केली. तसेच आरोपीची शिक्षा माफ करण्याची विनंती केली.

या याचिकेवर न्यायालयाने आरोपीची आई, पीडित मुलगी, तिचे नातेवाईक व वकिलांनी आरोपीची कारागृहात भेट घ्यावी आणि तसा अहवाल सादर करावा, असे आदेश दिले. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. चेतन ठाकूर यांनी बाजू मांडली.