चहा विक्रेत्या आई-मुलास उच्च न्यायालयाचा दिलासा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : एका खुनाच्या खोटय़ा गुन्ह्य़ात अडकवल्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पोलीस व गृह विभागावर ताशेरे ओढत पीडित आई व मुलास प्रत्येकी अडीच लाख रुपये असे एकूण पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. चौदा वर्षांनंतर पीडित आई व मुलास अखेर उच्च न्यायालयातून न्याय मिळाला आहे.

शीला मधुकर गुडधे आणि मनोज मधुकर गुडधे असे पीडित आई व मुलाचे नाव आहे. गणेश विसर्जनादरम्यान २८ सप्टेंबर २००४ ला यशवंत स्टेडियमजवळ सोहम यादव याचा खून करण्यात आला होता. त्यावेळी मनोज व सोहममध्ये वाद झाला होता. त्या प्रकरणात धंतोली पोलीस ठाण्याचे तत्कालिन पोलीस उपनिरीक्षक ए.एच. बरैया यांनी खुनाचा गुन्हा दाखल करून शीला व मनोज यांना अटक केली होती. या खुनात मनोज व शीला यांचा सहभाग नसताना त्यांना अडकवण्यात आले, असा आरोप झाला.

त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते उमेशबाबू चौबे यांनी पोलिसांच्या कारवाईविरुद्ध आवाज उठवला होता. त्यानंतर सीआयडीकडून प्रकरणाची चौकशी करण्यात आली. सीआयडीनेही प्रकरणातील आरोपी शीला व मनोज यांच्याविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे नसल्याचा अहवाल दाखल करून उपनिरीक्षक बरैया यांच्यावर ताशेरे ओढले होते. त्यानंतर १० ऑगस्ट २००७ मध्ये सत्र न्यायालयासमक्ष खटला चालवण्यात आला. सर्व साक्षीपुरावे तपासून न्यायालयाने आरोपींची निर्दोष सुटका केली. त्याविरुद्ध सरकारने उच्च न्यायालयात अपील दाखल केले.

न्या. प्रदीप देशमुख आणि न्या. मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर कोणतेही ठोस पुरावे नसताना आणि सत्र न्यायालयाने निर्दोष सुटका केल्यानंतरही सरकारने अपील करावे, हे अतिशय वेदनादायी आहे. आजवर पीडितांना झालेला मनस्ताप लक्षात घेता सरकारने सहा महिन्यात त्यांना प्रत्येकी अडीच लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश दिले. तसेच सोहम यादवच्या पत्नीलाही कायद्यातील तरतुदीनुसार मदत करण्यात यावी व खऱ्या आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Court penalty five lakh to police for making fraud murder case
First published on: 11-09-2018 at 05:28 IST