अंमली पदार्थ तस्कराचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

मंगेश राऊत, नागपूर</strong>

एखादी व्यक्ती वैयक्तिक कारणांसाठी खून करते. मात्र, अंमली पदार्थाची तस्करी करणारे केवळ पैसा कमवण्यासाठी तरुणांचे पर्यायाने देशाचे भविष्य उद्ध्वस्त करीत असल्याचे मत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवले आहे.  इम्रान इलियास डल्ला या अंमली पदार्थ तस्कराने दाखल केलेल्या जामीन अर्जावर न्या. विनय देशपांडे यांनी हे मत व्यक्त केले असून तरुणाई उद्ध्वस्त करणाऱ्याला जामीन देणे योग्य होणार नाही, असे स्पष्ट करून जामीन अर्ज फेटाळला.

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) इम्रानला  ५५ ग्रॅम मेफ्रेडॉनसह (एमडी) पकडले होते. याप्रकरणी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली. याप्रकरणी जामीन अर्जात इम्रानने आपल्याला चुकीच्या पद्धतीने अटक केल्याचा दावा केला. पोलिसांनी आधी अटक केली व नंतर एका ठिकाणी नेऊन एमडी आपल्या ताब्यात दिल्याचा दावा केला. तसेच प्रकृतीच्या कारणास्तव जामीन देण्याची मागणी केली. पोलिसांनी त्याच्या जामिनाला विरोध केला. सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने डल्ला याच्यावर कारागृहातून उपचार करणे शक्य आहे. कारागृह प्रशासन उपचारात सहकार्य करीत नसेल, तर त्याने याचिका दाखल करावी. शिवाय पोलिसांनी आरोपीला कशाप्रकारे व कुठून अटक केली, हे तपासण्याची आता वेळ नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

मेफ्रेडॉन सेवनामुळे तरुणाईचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. अंमली पदार्थाचे तस्कर केवळ आर्थिक फायद्यासाठी देशाचा आधारस्तंभ असलेल्या तरुणाईलाच उद्ध्वस्त करीत आहेत. त्यामुळे समाज हितासाठी आरोपीला जामीन मंजूर करणे योग्य होणार नाही, असे मत नोंदवून न्यायालयाले अर्ज फेटाळला.