मितेश भांगडियांची याचिका फेटाळली

नागपूर : आमदार विजय वडेट्टीवार यांनी पारपत्र काढताना खोटी माहिती सादर केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करावी, अशी याचिका माजी आमदार मितेश भांगडिया यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. ती याचिका न्यायालयाने फेटाळली.

माजी आमदार मितेश भांगडिया यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनुसार, विजय वडेट्टीवार यांच्याविरुद्ध जवळपास दहा फौजदारी गुन्हे दाखल आहेत. पण, २९ मे २००१ ला पारपत्रकरिता अर्ज करताना त्यांनी आपल्याविरुद्ध दाखल गुन्ह्य़ांची माहिती लपवली. त्यानंतर दुसऱ्यांदा २५ जानेवारी २००७ ला पुन्हा अर्ज केले. यावेळीही त्यांनी आपल्याविरुद्ध दाखल गुन्ह्य़ांची माहिती लपवून पारपत्र विभागाची फसवणूक केली व पारपत्र मिळवले. यासंदर्भात पारपत्र विभागाकडे अनेक तक्रारी करून वडेट्टीवार यांची चौकशी करण्याची विनंती करण्यात आली. पण, विभागाने कोणतीच कारवाई न केल्याने याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने परराष्ट्र मंत्रालय, पारपत्र विभाग, नागपूर गडचिरोली पोलिसांना नोटीस बजावली होती. त्या नोटीसनंतर पारपत्र विभागाने चौकशी  केली. भांगडिया यांच्यावतीने अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी तर वडेट्टीवार यांच्यावतीने अ‍ॅड. देवेन चौहान यांनी बाजू मांडली.

पारपत्र विभागाकडून चौकशी सुरू

याप्रकरणी वडेट्टीवार यांनी स्वत: आपले पारपत्र जमा केले आहे. पारपत्र कार्यालयाकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीअंती पुढील कारवाई करण्याचे अधिकार विभागालाच आहेत. याप्रकरणी न्यायालय फौजदारी कारवाई करण्याचे आदेश देऊ शकत नाही, असे मत नोंदवून न्यायालयाने ही याचिका फेटाळली.