मेयोत प्रसूतीपूर्वी करोनाचे निदान झाले होते

नागपूर :  मेयो  रुग्णालयात प्रसूतीपूर्वी एका महिलेला करोनाचे निदान झाले. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. खबरदारी म्हणून आई- लेकीला वेगळे ठेवले गेले. बुधवारी ती महिला करोनामुक्त झाल्याचे कळताच पंधरा दिवसांनी तिने प्रथमच लेकीला कुशीत घेतले.

ममतेचा हृदय सोहळा बघून उपस्थितांच्याही डोळ्यात आनंदाश्रू तरळले. रुग्णालयातून सुट्टी झाल्यावर करोनामुक्त आई तिच्या मुलीला घेऊन घरी परतली.

अमरावतीच्या २८ वर्षीय महिलेनेही होणाऱ्या बाळाबाबत बरेच स्वप्न बघितले होते. पहिली प्रसूती असल्याने ती मोमीनपुरा परिसरात राहणाऱ्या तिच्या आई-वडिलांकडे आली होती. दरम्यान, करोनाचा  कहर सुरू झाला. महिलेच्या प्रसूतीची तारीख जवळ आल्याने नातेवाईकांनी तिला २८ एप्रिलला मेयोत दाखल केले. मोमीनपुरात सर्वाधिक बाधित आढळत असल्याने खबरदारी म्हणून तिचे नमुने तपासणीला पाठवले गेले.

दुसऱ्याच दिवशी सकाळी तिला प्रसूती वेदना सुरू झाली. अहवालाची प्रतीक्षा न करता तातडीने तिला शल्यक्रिया विभागात हलवले. याक्षणी तिला करोना असल्याचे निदान झाले. त्यानंतरही धाडसी डॉक्टरांनी  तिची सामान्य प्रसूती केली.  मुलगी झाल्यावर खबरदारी म्हणून तिला अतिदक्षता विभागात वेगळे ठेवले. यामुळे मेयोतील ३ डॉक्टर १ परिचारिका आणि ३ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना विलगीकरणात जावे लागले. दरम्यान, आई मुलीला  बघूही शकत नव्हती.

दरम्यान, मंगळवार आणि बुधवार असे सलग दोन दिवस आईचा अहवाल नकारात्मक आला. त्यामुळे तिच्यासह मुलीला रुग्णालयातून सुट्टी दिली गेली. महिला व तिच्या मुलीच्या प्रकृतीवर मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे, स्त्रीरोग व प्रसूती विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत उके, बालरोग विभागाचे डॉ. सी.एम. बोकडे यांनीही लक्ष दिले.