दररोज ४० हून अधिक मृत्यू, दीड हजारांवर नवीन बाधित

नागपूर : शहरातील करोनास्थिती जवळजवळ हाताबाहेर गेली आहे. येथे रोज ४० वर करोनाग्रस्त जीव गमावत असून दीड हजारांवर नवीन बाधित रोज आढळत आहेत. लक्षणे असलेल्या रुग्णांनाही औषध मिळायला मोठा विलंब होत असून चाचणी अहवालासाठीही दोन दोन दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे.

शासकीय रुग्णालयात गंभीर रुग्णांच्या तुलनेत खाटा उपलब्ध नाहीत. खासगी रुग्णालये खाटा असूनही उपचार नाकारत आहेत. सप्टेंबरमध्ये रुग्णवाढ होणार, असा इशारा आधी मिळाला असतानाही प्रशासनाने उपाययोजनांची गती वाढवली नाही. त्याचा फटका सर्वसामान्य नागपूरकरांना बसत असून आरोग्य, प्रशासनिक यंत्रणेचे अपयश रुग्णागणिक चव्हाटय़ावर येत आहे.

महापालिका प्रशासनाकडून एकीकडे नागरिकांना एकही लक्षण आढळताच तातडीने करोना चाचणी करण्याचे व उपचाराचे आवाहन केले जाते, तर दुसरीकडे महापालिकेच्या केंद्रात चाचणी केल्यावर सकारात्मक अहवाल आलेल्या अनेक बाधितांना औषधे मिळवण्यासाठी दुसऱ्या दिवसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. महापालिकेच्या बेजबाबदारपणामुळे अनेक रुग्णांचे प्राण धोक्यात येत आहेत.

बाधितांमध्ये सौम्य व मध्यम स्वरूपाची लक्षणे असल्याचीही संख्या अधिक असते. त्यांना तातडीने काही प्रतिजैविक औषधे आवश्यक असतात, परंतु अशा रुग्णांनाही महापालिकेकडून लवकर औषधे मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यात प्रतिजैविक आहे की नाही, हेही सांगण्यात येत नाही. घरी औषधे देण्यासाठी आलेले आरोग्य कर्मचारी रुग्णाला काही त्रास आहे काय, अशी विचारणाही करत नसून औषध दिल्यावर कुणाचीही सही घेऊन निघून जातात. महापालिकेच्या हेल्पलाइनबाबतही अनेक तक्रारी येत असून ऐन करोना काळात आयुक्तांना का बदलले, करोनास्थिती हाताबाहेर जात असतानाही प्रशासनाचा वेग का मंद आहे, गंभीर रुग्णांना वेळीच रुग्णवाहिका का मिळत नाही, असे अनेक प्रश्न नागपूरकर उपस्थित करीत आहेत.

तातडीने उपचाराच्या आवाहनाचे काय?

नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यासह महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना करोनाची लक्षणे आढळताच तातडीने चाचणी व उपचाराचे आवाहन केले जात आहे. परंतु चाचणी सकारात्मक आल्यावर महापालिकेकडून विलंबाने औषधे मिळत आहेत. त्यामुळे काही बाधित स्वत:च भीतीपोटी विविध डॉक्टर व औषधालयांत भटकंती करताना दिसतात. त्यातूनही संक्रमणाचा धोका वाढत असून महापालिकेतील सत्ताधारी निद्रावस्थेत आहे काय, असा प्रश्न इंटकचे त्रिशरण सहारे यांनी उपस्थित केला.

सध्या कामाचा ताण जास्त असतानाही महापालिकेचे कर्मचारी लवकरात लवकर संबंधितांपर्यंत औषधे पोहचवतात. नागरिकांची भीती कमी करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशननेही रविवारी एक वेबिनार घेतला. यात बाधितांनी घ्यायच्या काळजीसह इतरही माहिती दिली गेली. खासगी डॉक्टरांनाही आता उपचारासाठी नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

– राम जोशी, अति. आयुक्त (शहर), नागपूर महापालिका