महापालिकेविरोधात घोषणा

नागपूर : शहरात बुधवारी रात्री व्हीएमआयटी येथील विलगीकरण कक्षात जागा नसल्याने हावरापेठ आणि इतर भागातील लोकांना प्रवेश करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत बाहेर ताटकळत राहावे लागले. त्यामुळे संतापलेल्या लोकांनी गोंधळ घालून महापालिकेविरोधात घोषणा दिल्या. व्हीएनआयटी, सिम्बॉयसिस आणि पाचपावलीतील विलगीकरणातील लोकांना अतिशय सुमार दर्जाचे जेवण व वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी गुरुवारी समोर आल्या. अनेकांनी नगरसेवकांना सांगून बाहेरचे जेवण देण्याची विनंती केली.

शहरातील प्रतिबंधित भागातील लोकांना विलगीकरणात सोयी सुविध मिळत नसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाच्या विरोधात नागरिक नाराजी व्यक्त करत आहे. हावरापेठ व नाईक तलाव येथे करोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर तेथील ३०० पेक्षा जास्त लोकांना विलगीकरणासाठी रात्री उशिरा व्हीआरसीई केंद्रात आणण्यात आले.  मात्र तेथे व्यवस्था नसल्यामुळे रात्री उशिरा जवळपास तीन तास त्यांना बाहेर राहावे लागले. अनेक वृद्ध व लहान मुलेही होती. तेव्हा त्यांना पाणीही मिळाले नाही. व्यवस्था केल्यानंतर रात्री १च्या सुमारास त्यांना केंद्रात प्रवेश मिळाला.

आमदार निवास, वनामती, रविभवन, सिम्बॉयसिस, व्हीएनआयटी वसतिगृह, पाचपावली पोलीस क्वार्टर, प्रोझोन चिंचभवन आदी ठिकाणी ठेवलेल्या लोकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. राधा स्वामी सत्संग मंडळाकडून विलगीकरण केंद्रात जेवणाबाबत तक्रारी वाढल्या आहेत. एकवेळ जेवण द्या पण चांगले द्या, अशी मागणी व्हीएनआयटीमधील नागरिकांनी केली. चांगले जेवण देणे शक्य नसेल तर आम्हाला नगरसेवकांच्या माध्यमातून बाहेरून डबा बोलावण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी तेथील लोकांनी केली. सिम्बॉयसीसमध्ये सुद्धा अशाच तक्रारी आहेत.

डॉ. प्रवीण गंटावार यांना खडसावले

महापालिकेत बुधवारी घेण्यात आलेल्या बैठकीत वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार अनुपस्थित असल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. यानंतर आज ते महापालिकेत महापौर संदीप जोशी यांनी घेतलेल्या बैठकीत उपस्थित झाले. तेव्हा त्यांना चांगलेच खडसावण्यात आले.