माहिती अधिकारातून करोना काळातील वास्तव उघडकीस

नागपूर :  इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) वर्ष २०१९ च्या तुलनेत करोनाचा प्रादुर्भाव असलेल्या २०२० मधील आठ महिन्यात रुग्णसंख्या निम्म्याने घटली. परंतु येथे  दाखल रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण वाढल्याचा धक्कादायक प्रकार माहितीच्या अधिकारातून सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पुढे आणला आहे.

मेयो रुग्णालयात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत बाह्य़रुग्ण विभागात ७ लाख २७ हजार ८७ रुग्णांवर तर आंतरुग्ण विभागात ३६ हजार ९०२ रुग्णांवर उपचार केले गेले. ही संख्या १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट २०२० या आठ महिन्यांच्या कालावधीत घसरून बाह्य़रुग्ण विभागात २ लाख ३३ हजार ९६८ तर आंतरुग्ण विभागात १५ हजार ८१३ वर आली. मार्च- २०२० मध्ये करोनामुळे टाळेबंदी लागल्याने मेयोत पोहचण्यासाठी साधणांसह इतर अनेक अडचणी होत्या. त्यामुळेच ही संख्या खूप रोडावल्याचे दिसत आहे. त्यातच आंतरुग्ण विभागात दाखल रुग्णांच्या तुलनेत २०१९ मध्ये मृत्यूचे प्रमाण हे ६.०९ टक्के होते. तर २०२० मध्ये येथे आंतरुग्णांची संख्या घसरली, तरी दाखल रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण ९.२ टक्के नोंदवले गेले. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण ३ टक्के वाढल्याचे दिसत आहे.

दरम्यान, मार्च- २०२० पासून मेयोतही कोव्हिड रुग्णालय सुरू झाले. ३१ ऑगस्टपर्यंत येथे साडेतीन हजारावर करोनाबाधित रुग्णांवर उपचार झाले. त्यात २ हजार ९६ पुरुष, १ हजार ४२८ महिला, १९० मुलांचा समावेश आहे. यापैकी १ हजार २८६ पुरुष, १ हजार ४४ महिला, १२५ मुलांना उपचारानंतर सुट्टी दिली गेली.  २८५ पुरुष, १६८ महिलांचा करोनाने मृत्यू झाला. तेव्हा करोनाच्या मृत्यूमुळेच हे प्रमाण वाढल्याचा वैद्यकीय क्षेत्रात अंदाज आहे. दरम्यान २०१९ मध्ये  येथे २ हजार २५० तर १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट २०२० या आठ महिन्यांच्या कालावधीत येथे १ हजार ४६६ मृत्यू नोंदवले गेले.

राजीव गांधी व महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत येथे १ जानेवारी २०१९ ते ३० ऑगस्ट २०२० पर्यंत २ हजार ४०६ रुग्णांवर उपचार झाले. त्यापोटी २ कोटी ८२ लाख ८९ हजार ३५१ रुपये उपलब्ध झाले असून ९० लाख ७४ हजार ३४५ रुपये खर्च झाले. येथे करोना आजार हाताळण्यासाठी वर्ग चारचे १९२ व बाह्य़स्रोताचे १५० सफाई कामगार असल्याचेही माहिती अधिकारात सांगण्यात आले.

२५ टक्के निधी अखर्चित

मेयो रुग्णालयाला करोना काळात जिल्हा नियोजन समितीकडून यंत्रसामुग्री, जिल्हा आपत्ती प्राधिकरणाकडून यंत्र, औषधी, आहारासाठी, खनिकर्म खात्याकडून यंत्रसामग्री व सर्जिकल साहित्यासाठी, योजनेतर औषधी व सर्जिकल साहित्यासाठी, योजनांतर्गत यंत्रसामुग्रीसाठी एकूण २३ कोटी २४ लाख ४११ रुपये उपलब्ध झाले. त्यातील १७ कोटी ३१ लाख १११ रुपये खर्च झाले तर ५ कोटी ९३ लाख रुपये अखर्चित आहेत. परंतु हा निधी खर्च करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे मेयो प्रशासनाचे म्हणणे आहे.