महापालिका प्रशासनाचा दावा

नागपूर :  गेल्या दोन महिन्यात करोना चाचणी करणाऱ्यांची संख्या सहा ते सात हजार होती. पण गेल्या दहा दिवसात ही संख्या अर्ध्यावर आली आहे. परिणामी, करोग्रस्तांची संख्या कमी झाली आहे. असे घडण्याचे कारण चाचणी केंद्रांवरील नागरिकांची गर्दी कमी झाली, असा दावा  महापालिका प्रशासनाने केला आहे.

गेल्या महिन्यात करोना चाचणी करणाऱ्यांची संख्या सहा हजारावर होती. पण आता तीन ते साडेतीन हजार लोकांची चाचणी केली जात आहे.   जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत रुग्णसंख्या वाढली होती. कारण चाचणी करणाऱ्यांची संख्या सहा ते सात हजार होती.

परिणामी, बाधितांची संख्याही १५०० ते  २२००वर गेली होती. मात्र गेल्या काही दिवसात चाचणी करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. ऑगस्ट महिन्यात ७६ हजार चाचण्या, त्यानंतर १५ सप्टेंबपर्यंत ६५ हजार आणि त्यानंतर गेल्या १४ दिवसात ४४ हजारावर आली आहे. गेल्या चौदा दिवसात २६ हजार ६२८ लोकांची अ‍ॅन्टिजेन तर १८ हजार ५६६ लोकांनी आरटीपीसीआर चाचणी केली.

मधल्या काही दिवसात महापालिकेच्या करोना चाचणी केंद्रांवर मनुष्यबळ आणि इतर साधनांअभावी चाचण्यांची संख्या घटली होती. शहरातील ५० पेक्षा अधिक केंद्रांवर पाच ते सहा हजार चाचण्या दररोज होत होत्या. परंतु मधल्या काळात महापालिकेची यंत्रणा ढेपाळली आणि ग्रामीण भागातही चाचण्यांचे प्रमाण घटले आहे.

रविवारी केवळ १ हजार ७६४ चाचण्या झाल्यात. आरटीपीसीआरपेक्षा अ‍ॅन्टिजेन चाचणी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. गेल्या चौदा दिवसात अ‍ॅन्टिजेन चाचणी करणाऱ्यांची संख्या २६ हजार ६२८ तर आटीपीसीआर चाचणी करणाऱ्यांची संख्या १८ हजार ५६६ आहे. ऑगस्टमध्ये एकूण ७६ हजार लोकांनी तपासणी केली. तर सप्टेंबरमध्ये ५२ हजार चाचण्या झाल्या.  गेल्या दहा दिवसात चाचण्याची संख्या कमी का झाली, याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून संशोधन केले जात आहे. महापालिकेकडून घरोघरी सर्वेक्षण केले जात असले तरी प्रत्यक्षात चाचणी करणाऱ्याची संख्या मात्र कमी होत आहे. यामुळे पर्यायाने चाचणी केंद्रावरील गर्दीचा ओघ कमी झाला आहे.

गेल्या काही दिवसात चाचणी करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. व्यवस्थेत मात्र कुठेही कमतरता नाही. ५४ केंद्रावर सध्या आरटीपीसीआर व अ‍ॅन्टिजेन चाचण्यांची व्यवस्था केली आहे. कुठलेच केंद्र कमी करण्यात आले नाही किंवा साधनांची कमतरता नाही. चाचणी करणाऱ्यांची संख्या कमी का झाली, याबाबत आढावा घेतला जात आहे.

– जलज शर्मा अतिरिक्त आयुक्त, महापालिका