एफडीएच्या पथकाकडून मेडिकलची पाहणी

नागपूर : मेडिकलमधील रुग्णाच्या जेवणात शेण सदृश भाग आढळल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी विधान सभेत केली.

दरम्यान, मेडिकलमधील रुग्णांच्या जेवणात शेण सदृश भाग आढळल्याचा प्रकार समोर आल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे पथक आज गुरुवारी मेडिकलमध्ये धडकले. त्यांनी थेट रुग्णांसह त्यांचे नातेवाईक व शेजारच्या खाटेवरील रुग्णांचे म्हणणे नोंदवले. स्वयंपाक गृहाच्या पाहणीत पथकाला कर्मचाऱ्यांच्या हातात मोजे व डोक्यावर टोपी नसण्यासह इतर त्रुटी आढळल्याने मेडिकलला एक नोटीसही बजावण्यात आली.

सहाय्यक आयुक्त शरद कोलते यांनी अन्न व सुरक्षा अधिकारी उपलप यांच्या नेतृत्वात एक पथक मेडिकलमध्ये पाठवले. पथकाने वार्ड क्रमांक २ मधील उमेश पवार या रुग्णासह नातेवाईकांचे लेखी बयाण नोंदवले, परंतु मुलाने त्यावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. त्यानंतर पथकाने वैद्यकीय अधीक्षक कार्यालय गाठत तेथील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या पथकाने पालकची दाळभाजी, तूरदाळसह इतरही काही वस्तूंचे नमुने घेतले असून ते प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या नमुन्याच्या अहवालानंतरच नेमके कारण कळणे शक्य असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे म्हणणे आहे.

आक्षेपार्ह नमुने तपासण्याबाबतचा पेच!

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने पदार्थाचे नमुने बघितले. हे नमुने मेडिकलला दिल्याने ते कायदेशिररीत्या घेता येत नसल्याचे कळल्यावर ते स्वीकारण्यात आले नाही. याप्रसंगी मेडिकलच्या अधिकाऱ्यांना त्यांचे खातेही वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागाच्या अखत्यारित येत असल्याने त्यांना स्वत: ते पाठवता येत असल्याचे सांगण्यात आले.

समितीपुढे परिचारिका गैरहजर

या प्रकरणाच्या चौकशीसाठी औषधशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. योगेंद्र बनसोड, बालरोग विभागप्रमुख डॉ. दीप्ती जैन, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. लांजेवार आणि एक सदस्य अशा चार जणांची समिती गठित झाली आहे. समितीने वार्डातील परिचारिकेला गुरुवारी चौकशीसाठी बोलावले होते, परंतु ती गैरहजर राहिल्याने पहिल्या दिवशी काहीच काम झाले नाही. दरम्यान, शुक्रवारी समिती रुग्णांसह सगळ्यांचे बयाण नोंदवून सायंकाळी अहवाल सादर होणार आहे.